तोतया एनसीबी अधिकाऱ्याच्या दबावाचा बळी, जोगेश्वरीत भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या; दोघांना अटक, मित्रानेच रचला कट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 06:05 AM2021-12-27T06:05:07+5:302021-12-27T06:05:46+5:30
Crime News : सूरज परदेशी आणि प्रवीण वळिंबे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. परदेशी हा बांधकाम कंत्राटदार आहे तर, वळिंबे हा खासगी नोकरी करत असून आसनगाव येथील रहिवासी आहे.
मुंबई : हुक्का पार्लरमध्ये पार्टी सुरू असताना अचानक एनसीबीचा छापा मारल्याचे सांगत एका भोजपुरी अभिनेत्रीला ताब्यात घेतले. पुढे, कारवाईच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी २० लाखांच्या खंडणीसाठी तोतया एनसीबीच्या अधिकाऱ्याने दबाव टाकला. याच दबावात अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना जोगेश्वरीत घडली. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी एनसीबी अधिकारी असल्याचा बनाव करणाऱ्या दुकलीला अटक करण्यात आली आहे. मित्रानेच हा कट रचल्याची माहिती समोर येत असून त्याचा शोध सुरू आहे.
सूरज परदेशी आणि प्रवीण वळिंबे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. परदेशी हा बांधकाम कंत्राटदार आहे तर, वळिंबे हा खासगी नोकरी करत असून आसनगाव येथील रहिवासी आहे. अभिनेत्री जोगेश्वरी येथील हिल पार्कमध्ये भाड्याने राहत होती. पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० डिसेंबर रोजी अभिनेत्री आपल्या मित्र मैत्रिणीसह एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्टी करत होती. त्यादरम्यान या दुकलीने एनसीबीचा छापा पडल्याचा बनाव करत, अभिनेत्रीला ताब्यात घेतले.
कारवाई न करण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी केली. पुढे संबंधित रक्कम लवकर मिळण्यासाठी दबाव वाढवला. याच दबावाला कंटाळून अभिनेत्रीने २३ तारखेला जोगेश्वरी येथील हिल पार्क परिसरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती मिळताच, अंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अभिनेत्रीला जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वी तिला मृत घोषित केले.
मैत्रिणीच्या चौकशीत एनसीबी अधिकाऱ्याची माहिती समोर येताच अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली आहे.
मित्राचा शोध सुरू
अभिनेत्रीचा मित्र अझीम काझी आरोपींच्या संपर्कात होता. त्यानेच अभिनेत्रीकडून पैसे उकळण्यासाठी कट रचल्याचे समोर येत आहे. काझी पसार झाला असून त्याच्यासह त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एनसीबी अधिकाऱ्यांची खासगी सेना - मलिक
भोजपुरी अभिनेत्रीच्या आत्महत्येने एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा मुंबईतील खासगी सेनेचा अँगल तपासण्याची मागणी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
मुंबईत २३ डिसेंबरला एका भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची बाब समोर आली. काही लोक एनसीबीचे अधिकारी असल्याची बतावणी करून या अभिनेत्रीकडून पैसे उकळत होते, असे उघड झाले आहे. यात अधिकाऱ्यांनी खासगी सेना उभारली होती आणि त्यातून वसुली सुरू होती, असे ते म्हणाले.