भावाच्या लग्नात हवी ती चप्पल न मिळाल्याने बहिणीने उचललं टोकाचं पाऊल; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 12:35 PM2022-02-06T12:35:14+5:302022-02-06T12:36:46+5:30
लग्नाच्या घरातील आनंदावर काही मिनिटात विरजण पडलं. हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे.
नवी दिल्ली - राजस्थानमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. भावाच्या लग्नात हवी ती चप्पल न मिळाल्याने नाराज झालेल्या बहिणीने टोकाचं पाऊल उचललं आहे. लग्नाच्या घरातील आनंदावर काही मिनिटात विरजण पडलं. हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. नवरदेवाच्या एकुलत्या एका बहिणीने वरात निघण्यापूर्वीच विष घेऊन आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र येथेच तिचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील बस्सी मकवा गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकुलत्या एका बहिणीला भावाच्या वरातीत जाण्यासाठी आवडती चप्पल घेऊन दिली नव्हती म्हणून ती रुसली होती. यापूर्वी शुक्रवारी रात्री घरात लग्नापूर्वीचे विधी सुरू होते. घरातील सदस्यांसाठी कपडे आदी वस्तू खरेदी केल्या होत्या. मात्र कामात व्यस्त असल्यामुळे वडील मुलीला तिच्या आवडीच्या चपला घेऊन देऊ शकले नाहीत. वडिलांनी नंतर चप्पल देण्याचं वचन दिलं होतं. मात्र घरात स्वत:कडे दुर्लक्ष सहन झालं नाही आणि मुलीने आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष प्यायल्यानंतर मुलीला अस्वस्थ होऊ लागलं. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे तिचा मृत्यू झाला. दुसरीकडे वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, त्याच्या मोठ्या भावाची वरात आज सकाळी निघणार होती. रात्री घरात लग्नापूर्वीचे विधी होते. भावाच्या लग्नात तिला हवी तशी चप्पल मिळाली नव्हती. आज तिला चप्पल घेऊन देणार होतो, मात्र त्यापूर्वीच तिने विष खाऊन आत्महत्या केली. मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना खूप मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.