प्रेयसीच्या धमकीमुळे आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 06:29 AM2019-05-09T06:29:20+5:302019-05-09T06:29:34+5:30
प्रेयसीच्या धमकीला कंटाळून अंधेरीत हेअर ड्रेसरचे काम करणाऱ्या शोभित सिंह (२७) या तरुणाने माथेरानमध्ये जाऊन आत्महत्या केली.
मुंबई : प्रेयसीच्या धमकीला कंटाळून अंधेरीत हेअर ड्रेसरचे काम करणाऱ्या शोभित सिंह (२७) या तरुणाने माथेरानमध्ये जाऊन आत्महत्या केली. तो बेपत्ता असल्याची तक्रार मुंबईत दाखल करण्यात आल्याने, यापुढील चौकशी अंबोली पोलीस करणार आहेत.
सिंह हा अंधेरीत हेअर स्टुडिओमध्ये काम करत होता. डी. एन. नगर परिसरात तो त्याच्या अन्य दोन मित्रांसह राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो बेपत्ता होता. याची तक्रार घरच्यांनी २९ एप्रिल, २०१९ला अंबोली पोलीस ठाण्यात केली. माथेरानच्या एका हॉटेलात मंगळवारी त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत नेरळ पोलिसांना सापडला. त्याच्या बॅगेत सुसाइड नोटही सापडली होती.
त्याचे मूळ गाव लखनऊ आहे. दोन वर्षांपूर्वी तिथल्या मुलीसोबत त्याचे प्रेम जुळले. मुलगी मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईला आली. सिंहही तिच्यामागे मुंबईत आला. मैत्रिणीने त्याच्याशी संबंध तोडले आणि ती दुसºयाच्या प्रेमात पडली.
सिंहच्या सुसाइड नोटनुसार ती मुलगी बलात्काराच्या आरोपाखाली अडकविण्याची धमकी देत होती. त्याला कंटाळून आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने म्हटले आहे. १४ एप्रिल, २०१९ला पंकज मिश्रा या मित्राला मेसेज करून या छळाबद्दल त्याने लिहिले होते. त्याचे मोबाइल लोकेशन माथेरान दाखवत होते. त्यानुसार, त्याच्या मित्राने त्याला शोधण्यासाठी माथेरान पिंजून काढले.