आयुष्य कंटाळवाणं झाल्याचा मेसेज करुन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 07:14 PM2018-11-23T19:14:37+5:302018-11-23T19:15:15+5:30
अश्विनने कर्जबारीपणाला वैतागून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई - लालबाग येथील फिन्ले मिलबाहेर कारमध्ये वडिलांच्या पिस्तुलीनं गोळ्या झाडून अश्विन ललितकुमार जैन (वय ३९) यांनी केली आत्महत्या आहे. गोल्ड कमिशन एजंट असलेल्या अश्विनने कर्जबारीपणाला वैतागून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लालबागमधील खटाव बिल्डिंगमध्ये राहणारे अश्विन जैन हे काल दुपारी २ वाजता घरातून निघाले. त्यानंतर ते घरी रात्री १० वाजले तरी घरी परतले नव्हते. त्यानंतर अश्विन यांनी त्याच्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना माय लाईफ इज बोअर, मैं ये दुनिया छोड के जा रहा हूं असा मेसेज केला होता. याबाबत अश्विनच्या घरच्यांना समजताच त्यांनी रात्री १० नंतर काळाचौकी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली. दरम्यान, आज दुपारी १. ३० वाजताच्या सुमारास लालबागमधील डॉ. एस. एस. राव रोडवरील फिन्ले मिलबाहेर पार्क केलेल्या पिवळ्या रंगाच्या वॅगनआर कारमध्ये मृतदेह असल्याची माहिती काळाचौकी पोलिसांनी मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असता पिस्तुलने गोळी झाडून अश्विन यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. अश्विन हे गोल्ड कमिशन एजंट म्हणून व्यवसाय करायचे आणि काळबादेवी येथे त्यांचे कार्यालय आहे. व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे अश्विन काही दिवसांपासून कर्जबाजारी झाले होते. त्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे पोलीस सूत्रांनी लोकमतशी बोलताना सांगितले.