आमदाराचे नाव घेत केली आत्महत्या, एफआयआर दाखल, तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 09:02 AM2023-01-03T09:02:54+5:302023-01-03T09:03:10+5:30
आमदार अरविंद लिंबावली यांनी सांगितले की, या आत्महत्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. पोलिसांनी माझी चौकशी करावी. मी त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे.
बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे एस. प्रदीप नावाच्या व्यक्तीने (वय ४७ वर्षे) गोळी झाडून आत्महत्या केली. आपल्या मृत्यूसाठी भाजपचे आमदार अरविंद लिंबावली यांच्यासहित सहा लोक जबाबदार आहेत, असे त्याने सुसाइड नोटमध्ये लिहून ठेवले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात एफआयआर दाखल केले असून तपास सुरू आहे.
आमदार अरविंद लिंबावली यांनी सांगितले की, या आत्महत्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. पोलिसांनी माझी चौकशी करावी. मी त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे.
आत्महत्या केलेल्या एस. प्रदीप यांनी २०१८ साली बंगळुरू येथील एका क्लबमध्ये १.२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ही रक्कम त्यांच्याकडून घेणारे गोपी व सोमय्या हे दोघे जण पैसे परत देण्याचे नाव काढत नव्हते. एस. प्रदीप यांनी एक कोटी रुपयांचे कर्ज काढून रक्कम क्लबमध्ये गुंतविली होती. त्या कर्जावरील व्याज भरण्यासाठी त्यांना आणखी कर्जे काढावी लागली. आपले शेत व घरही विकावे लागले. दोन व्यक्तींकडून आपले पैसे परत मिळावेत यासाठी एस. प्रदीप यांनी आमदार अरविंद लिंबावली यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. (वृत्तसंस्था)