अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्यासह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 20:15 IST2020-08-09T20:14:56+5:302020-08-09T20:15:28+5:30
मोनाली लक्ष्मण पारखी (२९) व जय लक्ष्मण पारखी (३) असे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या मायलेकाचे नाव आहे.

अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्यासह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
मारेगाव (यवतमाळ) : अवघ्या तीन वर्षांच्या पोटच्या मुलाला पोटाला बांधून मातेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील म्हैसदोडका येथे रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
मोनाली लक्ष्मण पारखी (२९) व जय लक्ष्मण पारखी (३) असे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या मायलेकाचे नाव आहे. रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास दोघेही मायलेक शेतात जातो, असे घरच्यांना सांगून घराबाहेर पडले. मात्र गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोधाने यांच्या शेतातील विहिरीत मोनालीने आपल्या लहान मुलाला पोटाला बांधून उडी घेतली.
आत्महत्या करण्यापूर्वी मोनालीने मारेगाव येथे गेलेल्या पतीला मुलासह बोधाने यांच्या विहिरीत आत्महत्या करीत असल्याचे फोनवरून सांगितले. याबाबत पतीने तात्काळ कुटुंबीयांना घटनास्थळी पाठविले. परंतु तोपर्यंत मायलेकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना कळताच, तात्काळ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
मोनालीच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. घाटंजी तालुक्यातील पंगडी येथील माहेरची मंडळी पोहोचल्यावर त्यांनी मारेगाव पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी पुढील तपास वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी करित आहे.