प्रेयसीचे पार्थिव घरी पोहोचवून प्रियकराची आत्महत्या; एका प्रेमकथेचा दुर्दैवी अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 11:06 PM2020-05-31T23:06:15+5:302020-05-31T23:07:01+5:30
पार्थिव स्वत:च्या वडिलांकडे सुपूर्द केल्यानंतर त्यानेही गावाबाहेर जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली आणि एका प्रेमकथेचा दुर्दैवी अंत झाला.
झरी (यवतमाळ) : घरची मंडळी लग्नाला विरोध करतील म्हणून त्या दोघांनी गावातून पलायन करत थेट हैदराबाद गाठले. मात्र तेथे मधुमेहाने ग्रस्त असलेल्या प्रेयसीची प्रकृती गंभीर बनली. त्यातच तिचा मृत्यू झाला. तिच्या अशा दुर्दैवी मृत्यूने अंतर्बाह्य हादरून गेलेल्या प्रियकराने रविवारी पहाटे २.३० वाजता तिचे पार्थिव घेऊन माथार्जुन गावात प्रवेश केला. पार्थिव स्वत:च्या वडिलांकडे सुपूर्द केल्यानंतर त्यानेही गावाबाहेर जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली आणि एका प्रेमकथेचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
झरी या दुर्गम तालुक्यातील माथार्जुन या गावातील प्रशांत (नाव बदललले आहे) याचे त्याच गावातील एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध जुळले. या दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या. परंतु दोनही कुटुंबातील लोकांकडून लग्नाला विरोध होईल म्हणून प्रशांत आणि त्याचे प्रेयसी या दोघांनीही २३ मे रोजी गावातून पलायन करून त्यांनी थेट हैद्राबाद गाठले. इकडे गावातून प्रेमीयुगल बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. दरम्यान, मुलीच्या आईवडिलांनी यासंदर्भात पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि ३६३ अन्वये गुन्ह्याची नोंद केली होती. हैद्राबादमध्ये पोहोचल्यानंतर मधुमेहाने आधीच त्रस्त असलेल्या प्रशांतच्या प्रेयसीची प्रकृती गंभीर बनली. त्यामुळे उपचारासाठी हैद्राबादच्या एका रूग्णालयात तिला दाखल करण्यात आले.
मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. परिणामी प्रशांत चांगलाच हादरून गेला. काय करावे त्याला सुचेना. अखेर एका रूग्णवाहिकेमध्ये ‘तिचे’ पार्थिव घेऊन रविवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास तो माथार्जुन गावात पोहोचला. त्याने प्रेयसीचे पार्थिव स्वत:च्या वडिलाकडे सोपवून हंबरडा फोडला व तेथून तो निघून गेला. रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास गावापासून काही अंतरावर असलेल्या पाटणाई ते माथार्जुन मार्गावर गस्तीवर निघालेल्या पोलिसांना प्रशांत रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला तातडीने झरीच्या रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान पहाटे ५ वाजता त्याचाही मृत्यू झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोघांचेही स्वॅब तपासणीसाठी यवतमाळला पाठविण्यात आले आहे. सायंकाळी उशिरा या दोघांच्याही पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले.
केवळ एक आठवड्याचा सहवास
गेल्या दोन वर्षांपासून प्रशांत आणि गावातील एका अल्पवयीन युवतीचे प्रेमसंबंध होते. यादरम्यान लपून-चोरून एकमेकांना भेटत असत. दोघांची लग्न करण्याची तीव्र इच्छा होती. परंतु घरच्यांचा विरोध होईल, ही त्यांच्या मनातील भावना पक्की झाल्याने त्यांनी एक आठवड्यापूर्वी गावातून पलायन केले. मात्र दुर्दैवाने या दोघांनाही केवळ एक आठवड्याचाच सहवास लाभला.