१६ वर्षाच्या मुलीची आत्महत्या; मृत्यूच्या २ दिवसांनी Instagram मुळे उलगडलं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 12:34 PM2023-09-14T12:34:40+5:302023-09-14T12:35:22+5:30
या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी गावातील पुजारी होता.
खंडवा जिल्ह्यातील एका गावात युवतीच्या आत्महत्येला घरगुती कारण समजून अनेकांनी दुर्लक्ष केले होते. परंतु जेव्हा तिचा फोन तपासला तेव्हा तिच्या आत्महत्येचे रहस्य उघड झाले. या युवतीला गावातील एक पुजारी त्रास देत होता. हे युवतीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कळाले. त्यानंतर कुटुंबाने पोलिसांकडे याची तक्रार केली. त्यानंतर पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
पिपलोद ठाणे हद्दीतील ही घटना आहे. ज्याठिकाणी २९ ऑगस्टला १६ वर्षीय युवतीने घरात गळफास घेत आत्महत्या केली. वडिलांची सातत्याने तब्येत खराब असल्याने कुटुंब मानसिक तणावाखाली होते. मुलीने याच दडपणाखाली येऊन आत्महत्या केल्याचा कुटुंबाला अंदाज होता. स्वत:चे आयुष्य संपवताना मुलीने कुणालाही काही सांगितले नाही अथवा सुसाईड नोटही लिहिली नाही. २ दिवसांनी जेव्हा मृत मुलीचा मोबाईल तपासला तेव्हा इन्स्टाग्रामवर तिचे आणि गावातील पुजाऱ्याचे चॅटिंग समोर आले. त्यात पुजारी अश्लिल शिवीगाळ करून तिला धमकावत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पुजाऱ्याविरोधात नातेवाईकांनी तक्रार नोंदवत त्यामुळे मुलीने आत्महत्या केली असल्याची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आत्महत्येला उकसवल्याबद्दल पुजाऱ्यावर गुन्हा दाखल केला. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, २९ ऑगस्टला माझ्या मुलीने आत्महत्या केली होती. आम्ही मुलीचा मोबाईल २ दिवसांनी चेक केला तेव्हा मंदिरातील पुजारी तिला धमकावत असल्याचे समोर आले. तुझी उल्टी गिनती सुरू झालीय असं सांगत त्याने धमकावले होते. पुजाऱ्याने तिला दहशतीखाली ठेवले होते. आम्ही हे सर्व पोलिसांना कळवले आहे. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मुलीच्या कुटुंबाने केली आहे.
या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी गावातील पुजारी होता. पंडित असल्याने तो पूजाविधी करायचा. काम पवित्र आणि कृत्य अपवित्र करत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. सोशल मीडियावर हा पुजारी फोटो अपलोड करायचा त्यात हातात बंदूकही दिसत आहे. सध्या याप्रकरणी पोलीस आणखी तपास करत आहेत.