गुंजमाथा शिवारात प्रेमी युगुलाची आत्महत्या; पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
By निलेश जोशी | Published: December 22, 2023 11:47 PM2023-12-22T23:47:49+5:302023-12-22T23:48:36+5:30
मुलगा २२ वर्षांचा तर मुलगी ही अल्पवयीन होती
नीलेश जोशी, साखरखेर्डा (बुलढाणा) : सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदुर्जन येथील एका प्रेमी युगुलाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. यातील मुलगा २२ वर्षांचा तर मुलगी ही अल्पवयीन होती. साखरखेर्डा ते गुंज माथा मार्गावर डाव्या बाजूला सवडद शेतरस्त्यावर समाधान गवई यांचे शेत आहे. या शेतात शेंदुर्जन येथील या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. १८ डिसेंबर रोजी मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्यासंदर्भाने पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल रामदास वैराळ यांच्याकडे दिला होता.
दरम्यान, २२ डिसेंबर रोजी गुंज माथा शिवारात आडवाटेवरील एका शेतात या दोघांनी आत्महत्या करीत जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार स्वप्निल नाईक, पीएसआय गजानन मुंढे, रामदास वैराळ, नितीन राजे, जनार्दन इंगळे यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करीत दोघांचेही पार्थिव सायंकाळी पाच वाजता शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.
--परिसरातील चौथी आत्महत्या--
गुंज माथा परिसरातील ही आतापर्यंतची चौथी आत्महत्येची घटना आहे. त्यामुळे हा परिसर आत्महत्या करणाऱ्यांसाठी पॉइंट तर बनला नाही ना? अशी चर्चा साखरखेर्डा परिसरात आहे.