"जगात सर्वकाही करा, पण लग्न करू नका..." म्हणत युवकानं घेतला टोकाचा निर्णय, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 02:35 PM2024-09-03T14:35:52+5:302024-09-03T14:37:26+5:30

सोमवारी दुपारी या युवकाने गळफास घेत आत्महत्या केली असून मृत्यूपूर्वी त्याने एक व्हिडिओ बनवून मित्रांना पाठवला. 

Suicide of youth in Ghaziabad, Uttar Pradesh, allegations of mental torture against wife and in-laws | "जगात सर्वकाही करा, पण लग्न करू नका..." म्हणत युवकानं घेतला टोकाचा निर्णय, काय घडलं?

"जगात सर्वकाही करा, पण लग्न करू नका..." म्हणत युवकानं घेतला टोकाचा निर्णय, काय घडलं?

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथं खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. या युवकाने मृत्यूपूर्वी केलेला व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात हा युवक मित्रांनो, लग्न करू नका असा संदेश देतोय. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला.

या मृत युवकाचं नाव जगजीत सिंह राणा असं आहे. ही घटना अंकुश विहार परिसरात घडली. आत्महत्येपूर्वी जगतीत सिंहने मित्रांना व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवला. या व्हिडिओत युवक गळ्यात गळफास घेताना दिसतो. मृत्यूपूर्वी तो सांगतो की, मी सुसाईड करत आहे, त्यासाठी पत्नी आणि सासरचे लोक जबाबदार राहतील. मी पूर्ण शुद्धीत हा व्हिडिओ बनवत असून माझ्या जीवाला धोका असल्याचं युवक व्हिडिओत सांगतो. 

पत्नी अन् सासरच्यांवर आरोप

व्हिडिओत पुढे युवक म्हणतो की, माझी पत्नी आणि तिच्या घरातले, तिच्या बहिणी आणि नातेवाईक यांच्यामुळे मला आत्महत्या करावी लागतेय. पत्नी आणि सासरचे लोक माझ्यावर जे आरोप करतायेत ते मी सहन करू शकत नाही. माझे सासर सिकंदराबादच्या बुलंदशहरात आहे. माझे सासरे बृजेश कुमार सोलंकी, मेहुणा शिवम सोलंकी, पत्नी गुडिया, सासू कुसुम देवी आणि पत्नीच्या बहिणी यांच्याकडून माझा मानसिक छळ होत असल्याचा आरोप युवक व्हिडिओत करतो. 

पोलिसांकडे मागणी

दरम्यान, ज्याप्रकारे हे लोक माझा छळ करतायेत ते मी शब्दात मांडू शकत नाही. मी कुणाला समजवू शकत नाही माझ्यासोबत काय होतंय, त्यामुळे मी सुसाईड करत आहे. मी पोलिसांना विनंती करतो की, या लोकांना कठोर शिक्षा करावी. माझ्या संपत्तीतील कुठलाही वाटा ना माझ्या पत्नीला, ना माझ्या मुलांना दिला जावा. माझ्या मृत्यूनंतर मृतदेह कुटुंबाला देऊ नका. माझे अंत्यसंस्कार सरकार, प्रशासनाकडून करावेत. माझा चेहरा कुणाला बघू देऊ नका. जगात सर्वकाही करा, पण लग्न करू नका असं सांगत युवकाने गळफास घेतला.  
 

Web Title: Suicide of youth in Ghaziabad, Uttar Pradesh, allegations of mental torture against wife and in-laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.