कर्करोगग्रस्त मातेची गतिमंद मुलीसह आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 06:53 PM2018-09-17T18:53:09+5:302018-09-17T18:54:36+5:30
विष प्राशून विहिरीत घेतली उडी, मेळघाटच्या नागापूर येथील घटना
चिखलदरा (अमरावती) - आपल्या असह्य आजाराने मृत्यू झाल्यावर गतिमंद असलेल्या मुलीचे काय होणार, या विवंचनेत सापडलेल्या एका मातेने स्वत: आणि १५ वर्षीय गतिमंद व अंध मुलीला विष पाजले. यानंतर तिला घेऊन विहिरीत उडी घेतली. दुहेरी आत्महत्येची ही घटना रविवारी चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथे दुपारी २ च्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कमला नारायण जामकर (वय ४०) व ज्योती नारायण जामकर (वय १५) असे आत्महत्या केलेल्या आई व मुलीचे नाव आहे. कमला जामकर या रक्ताच्या कर्करोगाने गेल्या काही दिवसांपासून ग्रस्त होत्या. त्यांना एक मुलगा असून, तो इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे. लग्न झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी पतीसोबत खटके उडाल्याने त्या माहेरी दोन मुलांसह राहत होत्या. रविवारी दुपारी ११ वाजता दोघीही माय-लेकी घरून निघाल्या. त्यांनी प्रथम विष प्राशन केले व नंतर धरणाच्या बुडीत क्षेत्रात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. घटनेची माहिती नागापूरच्या पोलीस पाटील अनिता संजीव धिकार यांनी चिखलदरा पोलिसांत केली. पोलिसांनी गावकºयांच्या मदतीने रविवारी रात्री दोघींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी शवविच्छेदन केल्यानंतर परिजनांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. घटनेचा तपास ठाणेदार आकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अंकुश राठोड, एएसआय सुरेश लाखोडे, निलेश काशीकर व सहकारी करीत आहेत.