कर्जाला कंटाळून गोळी झाडून व्यावसायिकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 03:02 AM2018-11-24T03:02:55+5:302018-11-24T03:03:08+5:30
कर्जाला कंटाळून स्वत:च्या गाडीतच डोक्यात गोळी झाडून व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना काळाचौकी येथे शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.
मुंबई : कर्जाला कंटाळून स्वत:च्या गाडीतच डोक्यात गोळी झाडून व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना काळाचौकी येथे शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.
काळाचौकी परिसरात खटाव चाळीत अश्विन ललित कुमार जैन (४०) हे पत्नी आणि मुलासोबत राहायचे. ते सोन्याच्या खरेदी-विक्री व्यवसायाशी संबंधित होते. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास दागिने, घड्याळ घरीच सोडून ते बाहेर गेले. त्यानंतर काही वेळाने त्यांचा मोबाइल बंद झाला. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या वडिलांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला.
शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास येथील साईबाबा मार्ग येथे पार्क केलेल्या पिवळ्या रंगाच्या कारमध्ये ते निपचित पडलेले दिसले. काळाचौकी पोलीस तेथे दाखल झाले तेव्हा उजव्या हातात रिव्हॉल्व्हर होती. त्यांनी डोक्यात गोळीत झाडून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांना केईएम रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
घटनास्थळी सुसाईड नोट मिळालेली नाही. प्राथमिक तपासात कर्जाच्या तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करीत आहेत. त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर वडिलांच्या नावावर असल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्यांच्या वडिलांचा काळबादेवी परिसरात भांडी विक्रीचा व्यवसाय आहे.
मित्रांना पाठवले संदेश
आत्महत्येपूर्वी जैन यांनी काही मित्रांना संदेश पाठवले. त्यानंतर मोबाइल बंद केला. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करीत आहेत.