सुपलवाडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या; जळगाव आर्वी शिवारात विहिरीत उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 05:11 PM2019-04-09T17:11:25+5:302019-04-09T17:18:32+5:30
गुढीपाडवा साजरा करू शकत नसल्याचे वैषम्य
चांदूर रेल्वे (अमरावती) - तालुक्यातील सुपलवाडा येथील शेतकऱ्याने कुटुंबाला गुढीपाडव्याला गोडधोड करून सण साजरा करू शकत नसल्याचे वैषम्य बाळगत ७ एप्रिल रोजी आत्महत्या केली. जळगाव आर्वी शिवारात त्यांनी विहिरीत उडी घेतली.
अनिल मधुकरराव कुंबरे (४०) असे मृताचे नाव आहे. धामणगाव (रेल्वे) मार्गातील जळगाव (आर्वी) येथील सुनील भोगे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्याकडे चार एकर वडिलोपार्जिंत कोरडवाहू शेती आहे. सोसायटीचे ५० हजार रुपये कर्ज आहे. त्यांच्या पश्चात वडील मधुकरराव कुंबरे (७०), पत्नी, आठ वर्षांची मुलगी व पाच वर्षांचा मुलगा असा आप्तपरिवार आहे.
गुढीपाडव्याच्या सणानंतर अनिल कुंबरे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. सुपलवाडा येथील तलाठ्याने लेखी अहवाल सादर केला. तथापि, महसूल विभागाकडून चौकशीसाठी एकही अधिकारी फिरकला नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
अनिल कुंबरे यांच्या आत्महत्येचा अहवाल प्राप्त झाला. धामणगाव येथून पोस्टमार्टमचा अहवाल प्राप्त झाल्यावर त्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येईल.
- आर. एस. इंगळे, तहसीलदार, चांदूर रेल्वे.