महाठग सुकेश चंद्रशेखरचं पुन्हा पत्र; वाढदिवसाला 'त्या' कैद्यांना ५ कोटी दान करण्याची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 12:47 PM2023-03-22T12:47:26+5:302023-03-22T12:47:48+5:30
सुकेशने याआधी पत्र लिहून जेलमध्ये मनिष सिसोदिया यांना VVIP ट्रिटमेंट मिळत असल्याचं म्हटलं. या ट्रिटमेंटची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्याने केली.
नवी दिल्ली - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर पुन्हा एकदा पत्रामुळे चर्चेत आला आहे. यावेळी वाढदिवसानिमित्त सुकेशने डीजींना पत्र लिहून महादान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सुकेश चंद्रशेखरनं सहकारी कैद्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. २५ मार्चला होणाऱ्या वाढदिवसासाठी सुकेशने डीजींना पत्र पाठवले आहे.
या पत्रात सुकेश चंद्रशेखरने सहकारी कैद्यांना ५ कोटी ११ लाख रुपये दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यात ज्या गरीब कैद्यांकडे जामिनासाठी पैसे नाहीत, पैसे नसल्याने ते कित्येक वर्ष जेलच्या कोठडीत आहेत. जे घरातील मुख्य व्यक्ती आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट आले आहे. मुलांचे शिक्षण थांबले आहे अशा कैद्यांना ही रक्कम देण्याची विनंती डीजींना पत्राद्वारे केली आहे.
त्याचसोबत सुकेशने याआधी पत्र लिहून जेलमध्ये मनिष सिसोदिया यांना VVIP ट्रिटमेंट मिळत असल्याचं म्हटलं. या ट्रिटमेंटची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्याने केली. CM अरविंद केजरीवाल मनिष सिसोदियांबाबत खोटी माहिती देत आहेत. मनिष सिसोदिया असुरक्षित असल्याचा दावा केजरीवाल करतायेत हे चुकीचे आहे. मनिष सिसोदिया जेल नंबर १ च्या ९ वार्डात आहेत जे तिहार जेलमधील सर्वात मोठा VVIP वार्ड आहे असा दावा सुकेशने पत्राद्वारे केला.
आरोपी सुकेश चंद्रशेखरने त्याचा खटला दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग करावा अशी विनंती केली आहे. त्याबाबत कोर्टात याचिका दाखल करत न्यायाधीशांवरच आरोप केले. मात्र पटियाला हाऊस कोर्टाने सुकेशच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. त्याचसोबत न्यायाधीशांवर केलेल्या आरोपावरूनही कोर्टाने कैदी सुकेशला फटकारले. सध्या कोर्टाने सुकेश चंद्रशेखरच्या न्यायालयीन कोठडीत ३१ मार्चपर्यंत वाढ केली आहे.
आम आदमी पार्टीला ६० कोटी रुपये दिले
याआधी सुकेशनं अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीवर आरोप केलेत. सुकेश चंद्रशेखरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर राज्यसभेच्या एका जागेच्या बदल्यात ५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर सुकेश चंद्रशेखरने अरविंद केजरीवाल यांच्यावर उद्योगपतींना त्यांच्या पक्षाशी जोडून ५०० कोटी रुपये गोळा केल्याचा आरोपही केला. त्या बदल्यात आम आदमी पार्टीकडून कर्नाटकात मोठ्या पदाची ऑफर दिल्याचा आरोप सुकेश चंद्रशेखरने केला होता.