BHR Bank Fraud : उच्च न्यायालयाने फटकारताच सुनील झंवरने अटकपूर्व घेतला मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 06:57 PM2021-03-17T18:57:57+5:302021-03-17T18:58:53+5:30
BHR Bank Fraud : जिल्हा न्यायालयात जाण्याचे आदेश : कंडारेच्या अर्जावर आज युक्तिवाद
जळगाव : अटकपूर्वसाठी जिल्हा न्यायालयात जायला अटकेपासून संरक्षण दिल्यानंतरही तेथे का गेले नाहीत? शेवटच्या दिवशी पुन्हा उच्च न्यायालयात का आलात,अटकपूर्व जामीन अर्ज मागे घ्या, अन्यथा आदेश करावा लागेल अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सुनील झंवर याला फटकारले. त्यानंतर झंवरच्या वकीलांनी अर्ज मागे घेतला. दरम्यान, यानंतर सुनील झंवर पुन्हा अज्ञातवासात गेला आहे.
बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात उद्योजक सुनील झंवर याला मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले होते. मुळ फिर्याद रद्द करण्यासाठी झंवर याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्यावर कामकाज करताना न्यायालयाने एक आठवड्यात झंवर याने पुण्याच्या विशेष सत्र न्यायालयात जावून अटकपूर्व जामीनासाठी जावे व त्यापुढील आठवड्यात न्यायालयाने निकाल द्यावा असे आदेश दिले होते, मात्र झंवर याने विशेष न्यायालयात न जाता पुन्हा उच्च न्यायालयातच अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केल्याने न्यायमूर्तींनी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच झंवर याला फटकारत अर्ज मागे घेण्याचे सांगून विशेष न्यायालयातच जाण्याचे सांगितले. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी हा संपूर्ण घटनाक्रम न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत झंवर याला दिलासा देण्याबाबत प्रखर विरोध केला. दरम्यान, याच प्रकरणात पोलिसांना हवा असलेला तत्कालिन अवसायक जितेंद्र कंडारे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी पुण्याच्या विशेष न्यायालयात युक्तीवाद होणार आहे.