सनशाईन कंपनीने इतर जिल्ह्यातही घातला गंडा, कोट्यवधीची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 07:40 PM2020-02-11T19:40:54+5:302020-02-11T19:41:12+5:30
कमी कालावधीत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष देऊन अनेकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडणाºया सनशाईन हायटेक इन्फ्राकॉम या कंपनीने गडचिरोलीसोबत राज्यातील अनेक जिल्ह्यात आपले जाळे पसरविले आहे.
गडचिरोली - कमी कालावधीत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष देऊन अनेकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडणाºया सनशाईन हायटेक इन्फ्राकॉम या कंपनीने गडचिरोलीसोबत राज्यातील अनेक जिल्ह्यात आपले जाळे पसरविले आहे. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात सदर कंपनीने २ कोटी २९ लाखांचा गंडा घालून पोबारा केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीत समोर आहे.
गडचिरोली जिल्ह्यात २ हजार १३७ ठेवीदार या कंपनीच्या भुलथापांना बळी पडले. गुन्हा दाखल झाल्यानंतर या कंपनीच्या दोन संचालकांना गेल्या ३ जानेवारीला पोलिसांनी अटक केली. इतर आरोपींच्या शोधात गडचिरोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मध्यप्रदेशात ठाण मांडून बसले आहे. आरोपींना शोधण्यासोबतच सदर कंपनीच्या मालमत्तेचाही ठावठिकाणा पोलीस लावत आहेत. कंपनीच्या मालमत्तेच्या लिलावातून पुढे गुंतवणूकदारांची रक्कम त्यांना परत मिळू शकेल का, याची चाचपणी पोलीस करत आहेत.
दरम्यान सनशाईन कंपनीने गडचिरोलीप्रमाणेच चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नंदूरबार अशा अनेक जिल्ह्यात कार्यालय उघडून गुंतवणूकदारांना आमिष दिले. परंतू आता तेथील कार्यालयेही या कंपनीने गुंडाळली आहेत. असे असले तरी या कंपनीकडे पैसे गुंतवणारे अनेक जण अजूनही पुढे आलेले नाहीत. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पुढे येऊन पोलीस तक्रार केल्यास त्यांच्या गुंतवणुकीचे पैसे कंपनीच्या मालमत्ता विक्रीतून त्यांना परत मिळू शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी तक्रार करण्यास समोर यावे, असे आवाहन गडचिरोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी केले आहे.