सुपारी प्रकरण: आणखी एका आरोपीस उत्तर प्रदेशातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 04:30 AM2018-08-02T04:30:15+5:302018-08-02T04:30:53+5:30
केडीएमसीचे भाजपाचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली आणखी एका आरोपीला ठाणे खंडणीविरोधी पथकाने उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतले.
कल्याण : केडीएमसीचे भाजपाचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली आणखी एका आरोपीला ठाणे खंडणीविरोधी पथकाने उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतले. याप्रकरणी नगरसेवक महेश पाटीलसह त्याचे साथीदार न्यायालयीन कोठडीत असून उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
१३ डिसेंबर रोजी ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सात जणांना दरोड्याच्या तपासात अटक केली होती. या आरोपींकडे केलेल्या तपासात नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी नगरसेवक महेश पाटील याने दिल्याची माहिती उघडकीस आली. याप्रकरणी २१ डिसेंबर रोजी महेश पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला. मे महिन्यात याच प्रकरणात आरोपींना हत्यारे पुरवणाऱ्या अनिल मुळेला अटक करण्यात आली होती. यामध्ये राजेश पटेल याचादेखील सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचा शोध सुरू असतानाच उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला अटक केली. ठाणे खंडणीविरोधी पथकाने त्याचा ताबा घेतला.
- कुणाल पाटील हत्येच्या सुपारी प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात राजेश पटेलचा सहभाग नेमका काय आहे, हे तपासाअंतीच निष्पन्न होईल, असे ठाणे खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी संदेश गावंडे यांनी सांगितले.