वसई-विरार महापालिकेतील प्रभारी अधिक्षकाने केली वसई आय कार्यालयातच कागदपत्रांची चोरी? सीसीटीव्ही कॅमेरे बघून आयुक्तांनी केलं तात्काळ निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 09:57 PM2021-09-17T21:57:08+5:302021-09-17T21:57:23+5:30
Crime News: आता तर चक्क वसई विरार महापालिकेतील कागदपत्रेच पालिकेच्या एका प्रभारी अधीक्षकाने पोत्यात भरून नेल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आला आहे.
वसई - वसई-विरार शहर महापालिकेतील ठेका अभियंतांचे शहरातील अनधिकृत बांधकामां संबंधित वसुलीचे प्रताप समोर आल्यावर आयुक्तांनी तात्काळ त्या सर्वावर कारवाईचा बडगा उगारून त्यांना घरचा रस्ता दाखवला होता. मात्र आता तर चक्क वसई विरार महापालिकेतील कागदपत्रेच पालिकेच्या एका प्रभारी अधीक्षकाने पोत्यात भरून नेल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आला आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्त गंगाथरन डी यांनी त्या अधिक्षकाला निलंबित करत सदर प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली आहे.
थॉमस रॉड्रीग्ज असे या कथित आणि चोट्या प्रभारी अधिक्षकाचे नाव आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती आय, वसई गाव प्रभाग कार्यालयात थॉमस रॉड्रीग्ज सुट्टीच्या दिवशी विनापरवानगी गेला असता त्याठिकाणी त्याने घरपट्टी विभागातील काही कागदपत्रांची हाताळणी केली. तदनंतर एका पांढऱ्या रंगाच्या पोत्यात कागदपत्रे व व काही वस्तू सपशेल घेऊन गेला होता खरं तर ही घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. मात्र उशिरा का होईना या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच आयुक्त गंगाथरन डी. यांनी पालिकेतील घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेजमध्ये रॉड्रीग्ज सुट्टीच्या दिवशी वसई कार्यालयात करीत असलेल्या संशयास्पद हालचाली व पोते भरून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान या प्रकरणी आयुक्तांनी रॉड्रीग्ज याला निलंबित केले असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु करत सध्या रॉड्रीग्ज याला सर्व चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आदेशही देण्यात बजावण्यात आले आहेत.
वसई विरार महापालिकेतील घरपट्टी विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. तर बेकायदा बांधकामांना घरपट्टी लावण्यासाठी अक्षऱशः नागरिकांची लुबाडणूक केली जात असल्याचाही आरोप केला जातो. त्यामुळे अनधिकृत बांधकामे व त्यास घरपट्टी लावल्या आहेत त्या कशा व कधी व त्यासाठी किती पैसे आकारले एकूणच नेमकं या घरपट्टी लावण्यासाठी कितीचा भ्रष्टाचार झाला आहे हे कदाचित उघड होऊ नये यासाठीच ही कागदपत्रे लंपास केली असावी अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे नेमक्या रॉड्रीग्जने घरपट्टी विभागातीलच कागदपत्रांची हाताळणी करून काही वस्तू व संचिका तर चोरून नेल्या नाहीत ना हे पाहणे गरजेचे आहे तसेच या सर्व प्रकारात त्याच्यासोबत अन्य कोणी कर्मचारी अधिकारी वर्ग किंवा दलाल तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सामील आहे का हे पाहणं आवश्यक आहे.
गंभीर प्रकरणात विलंब का लागला, प्रकरण दाबायचे होते का ?
ततत्कालीन नवघर मणिकपूर नगरपरिषद असताना कार्यरत असलेल्या थॉमस रोड्रिंक्स याने जास्तीत जास्त काळ नवघर माणिकपूर कार्यालयातच काढला त्यात आता रॉड्रीग्ज सुट्टीच्या दिवशी कुणाच्या परवानगीने कार्यालयात गेला व त्यांनी कोणत्या वस्तू व कागदपत्रे चोरून नेली आणि रॉड्रीग्ज याच्या या चोरीची अनेक दिवस चर्चा रंगली असताना वसई प्रभाग समिती कार्यालयातील सहाय्यक आयुक्त आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची दखल का घेतली गेली नाही, असे नानाविध अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
नवघर माणिकपूर कार्यालयातुन होतंय लॉबिंग ?
महत्वाचे म्हणजे रॉड्रीक्स तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेचा कर्मचारी असून सध्या महापालिकेच्या विविध विभागात नवघर-माणिकपूरमधील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या लॉबीचेच वर्चस्व असल्याचे बोलले जात आहे. तर काही नागरिकांनी आता घरपट्टी विभागात काम केलेले तसेच सहाय्य्क आयुक्त, उपायक्त यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केल्याने या प्रकरणी स्वतः आयुक्त काय ठोस भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे की प्रकरण दाबतात का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.