अंधश्रद्धेपायी ३ वर्षीय चिमुरडीला ९० फुटांवरून फेकले; विकृत मारेकऱ्याचे ६ महिन्यांपासून मुंबईत वास्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 08:31 PM2019-09-09T20:31:27+5:302019-09-09T20:36:48+5:30
कुलाबा बालिका हत्या प्रकरण : जादूटोणा प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा
मुंबई - बालिकेला सातव्या मजल्यावरुन खाली फेकून निर्घृण हत्या करणारा विकृत मारेकरी सहा महिन्यापासून मोरक्को येथून मुंबईतील फ्लॅटवर वास्तव्याला आला होता. तांत्रिक शक्तीच्या करणीतून मुक्तीसाठी त्याने ३ वर्षाच्या शनाया हातरामानी हिला ९० फुट उंचीवरुन फेकल्याची धक्कादायक बाब तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे त्याच्यावर सोमवारी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने शनायाच्या जुळ्या बहिणीलाही मारण्याचा आरोपी अनिल चुगानी याचा प्रयत्न होता.
अनिल चुगानीचे रेडिओ क्लब येथील ब्रम्हाकुमारी मार्गावरील अशोका अपार्टमेंटच्या ए विंगमध्ये सातव्या मजल्यावर वडिलोपार्जित फ्लॅट आहे. त्याच्या शेजारी रहात असलेल्या प्रेमलाल हातरामानी याच्याशी बालपणापासून परिचित होता. काही वर्षापासून तो कुटुंबियासमवेत मोरक्को येथे स्थायिक झाला होता. त्यानंतरही दरवर्षी दोन महिन्यासाठी तो कुलाब्यातील फ्लॅटवर रहाण्यासाठी येत असत. मात्र यावेळी तो फेबु्रवारीच्या अखेरीस आला होता.वैफल्यग्रस्त अवस्थेत असलेल्या अनिलला आपल्यावर काळी जादू (ब्लॅक मॅजिक) झाली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी दोन बालिकेचा बळी देणे आवश्यक असल्याचा त्याचा समज झाला होता. त्यासाठी ६ महिन्यापूर्वी मुंबईत येवून प्रयत्न सुरु केले होते. याठिकाणी आल्यानंतर त्याने मित्र प्रेमलाल याच्या लहान मुलींचा बळी देण्याचे ठरविले. त्यानुसार शनिवारी सायंकाळी त्याने आपल्याला एकटेपणा वाटत असल्याचे सांगून तिच्या तीनही मुलांना फ्लॅटमध्ये खेळण्यासाठी पाठवून देण्याची विनंती केली. त्यानूसार त्यांनी सहा वर्षाची जाई व श्रीया व शनाया या ३ वर्षाच्या मुलींना पाठवून दिले. अनिलने त्याच्या समवेत खेळण्याचे नाटक करु लागला. तिघींना गुंगीचे औषध घातलेले चॉकलेट खाण्यास दिले. त्या बेशुद्ध झाल्यानंतर त्याने शनायाला उचलून घेत बेडरुममध्ये जावून खिडकीतून खाली फेकले. त्यानंतर तो पुन्हा हॉलमध्ये येवून श्रीयाला उचलून घेतले असता ती जागी होवून ओरडू लागल्यानंतर तिच्या बहिणीलाही जाग आली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना हा प्रकार लक्षात आला. अनिल चुगानीला १३ सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून या कृष्णकृत्याबाबत आणखी माहिती घेतली जात आहे, त्याच्या कटात आणखी कोणी सहभागी आहे का? याचीही माहिती घेतली जात असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.