आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध करमुसे प्रकरणी पुरवणी आरोपपत्र
By जितेंद्र कालेकर | Published: May 24, 2023 10:12 PM2023-05-24T22:12:54+5:302023-05-24T22:13:17+5:30
४५० पानांचा समावेश: यापूर्वी दोन आरोपपत्र दाखल
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध अभियंता अनंत करमुसे मारहाण तिसरे पुरवणी आरोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी बुधवारी दिली. याच प्रकरणात यापूर्वी दोन आरोपपत्र दाखल केलेले आहेत.
सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या करमुसे याला मारहाण केल्याचा प्रकार ५ एप्रिल २०२० मध्ये घडला होता. याप्रकरणी ६ एप्रिल रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये आव्हाड यांच्यासह १३ जणांना पोलिसांनी अटक केली होती.
यातील एक कथीत आरोपी असलेले मुंबई विशेष सुरक्षा शाखेतील पोलीस हवालदार तसेच एकेकाळचे आव्हाड यांचे अंगरक्षक वैभव कदम यांनी तळोजा भागात रेल्वेखाली आत्महत्याही केली होती. आपण या प्रकरणात निर्दोष असल्याचे मोबाईलवर स्टेटस ठेवत त्यांनी आत्महत्या केल्याने पोलीस वर्र्तुळात एकच खळबळ उडाली होती. वागळे इस्टेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त गजानन काब्दुले यांच्याकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यापूर्वीही दोन आरोपपत्र न्यायालयात दाखल केली आहेत. पूर्वीच्या तपासाच्या अनुषंगाने नव्या ४५० पानांच्या या आरोपपत्रात काही पुरावेही जोडले आहेत.
हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आपण यावर भाष्य करणार नसल्याचे काब्दुले म्हणाले. याच प्रकरणात आव्हाड यांना अटक झाल्यानंतर तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर आॅक्टोबर २०२१ मध्ये जामीनावर त्यांची सुटकाही झाली होती.