शिवसेना नेत्याच्या हत्येतील आरोपीच्या समर्थकांचा बंदूक तलवारीने पोलिसांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 10:07 AM2023-02-24T10:07:05+5:302023-02-24T10:07:39+5:30
आरोपीसाठी राडा; अटकेचा निषेध करताना ठाणेच घेतले ताब्यात
चंडीगड - वारीस पंजाब दे या शीख संघटनेचे प्रमुख कट्टरपंथी अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी गुरुवारी तलवारी आणि बंदूक घेऊन अजनाला पोलिस ठाण्याबाहेर राडा करीत पोलिस ठाणे ताब्यात घेतले. अमृतपाल यांच्या उपस्थितीत निकटवर्तीय लवप्रीत तुफानच्या अटकेच्या निषेधाच्या वेळी हा अभूतपूर्व प्रसंग घडला.
आपल्या आणि सहकाऱ्यांविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द केला नाही, तर समर्थकांसह अजनाला पोलिस ठाण्याला घेराव घालण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर निदर्शक पोलिस ठाण्याच्या बाहेर पोहोचू नयेत, यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, पोलिसांचा हा बंदोबस्त अपुरा ठरला आणि मोठ्या संख्येने निदर्शक जमले. अमृतसर पोलिसांनी अजनाला पोलिस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर विशेष नाकाबंदी केली होती. तरीही मोठ्या संख्येने तलवारी, बंदुका घेऊन आलेल्या लोकांनी राडा केला आणि पोलिस ठाणे ताब्यात घेतले. तेव्हापासून तणावाचे वातावरण आहे.
शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्येप्रकरणी अमृतपाल सिंग यांचे नाव समोर आले होते. पोलिसांनी संदीप सिंहला अटक केली होती. संदीपने त्याच्या अकाउंटवरून अमृतपाल यांचे अनेक व्हिडीओ पोस्ट केले होते, ज्यात खलिस्तान समर्थक नेत्यांसोबतच्या भेटीचा व्हिडिओही होता.
आरोपीची उद्या सुटका करणार
ज्या आरोपीच्या सुटकेसाठी राडा घातला, त्या आरोपीची शुक्रवारी सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अमृतसर ग्रामीणचे एसएसपी सतिंदर सिंह यांनी सांगितले. अमृतपाल व समर्थकांनी दिलेल्या पुराव्यानुसार आरोपी घटनास्थळी नव्हता, असे पुढे आले आहे. शुक्रवारी कोर्टात अर्ज देऊन आरोपीला सोडले जाईल.