भाजप नगरसेवक महेश पाटीलचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 01:47 PM2018-09-19T13:47:02+5:302018-09-19T13:50:59+5:30
जानेवारी 2018 मध्ये भिवंडी तालुक्यातील गणोशपुरी पोलिसांनी कॅश व्हॅन लुटल्याच्या दरोडा प्रकरणात सात जणांना अटक केली होती. या अटक आरोपींनी पोलिसांच्या तपासात माहिती दिली की, अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी भाजप नगरसेवक महेश पाटील, सुजित नलावडे आणि विजय भाकडे यांनी दिली होती.
कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेतील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भाजप नगरसेवक महेश पाटील यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने नाकारल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती नगरसेवक कुणाल पाटील यांच्या वकीलांनी दिली आहे.
जानेवारी 2018 मध्ये भिवंडी तालुक्यातील गणोशपुरी पोलिसांनी कॅश व्हॅन लुटल्याच्या दरोडा प्रकरणात सात जणांना अटक केली होती. या अटक आरोपींनी पोलिसांच्या तपासात माहिती दिली की, अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी भाजप नगरसेवक महेश पाटील, सुजित नलावडे आणि विजय भाकडे यांनी दिली होती. या प्रकरणी पोलिस अधिकारी व्यंकटेश आंधळे यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यावर नगरसेवक महेश पाटील यांनी कल्याण न्यायालयात व उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.त्यांचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला. त्यापश्चात महेश पाटील पोलिसांना शरण आले. पोलिसानी त्यांना अटक केली. दहा दिवसाच्या पोलिस कोठडीपश्चात महेश पाटील यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यांच्या विरोधात दोषारोप पत्न पोलिसांनी दाखल केले आहे. महेश पाटील यांच्यासह अन्य दोन जणांनी कल्याण न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. कल्याण न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. कल्याण न्यायालयाने जामीन नाकारल्यावर महेश पाटील यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. महेश पाटील यांनी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्च नाकारला असल्याची माहिती कुणाल पाटील यांचे वकील डी. एन. रे यांनी दिली आहे.