मोबाइलवर गेम खेळू दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलाकडून वडिलांचा गळा दाबून खून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 12:58 PM2021-09-03T12:58:08+5:302021-09-03T12:58:46+5:30
Crime News : शवविच्छेदन अहवालात अर्जुन यांचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
सूरत : मोबाइल हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, पण तोच मोबाइल लोकांच्या आयुष्याचाही नाश करत आहे. गुजरातमधील सूरतमध्ये असेच एक प्रकरण समोर आले असून, वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलाला मोबाइल गेम खेळण्यापासून अडवले असता मुलाने आपल्या वडिलांचा गळा दाबून खून केला.
सुरत शहरातील इच्छापोर पोलीस स्टेशन परिसरातील कवास गावात राहणारे अर्जुन अरुण सरकार यांच्यासोबत ही घटना घडली. अर्जुन सरकार हे पत्नी डॉली आणि एका मुला अरुण यांच्यासोबत राहत होते. मंगळवारी अर्जुन यांना बेशुद्ध अवस्थेत पत्नी डॉली यांनी सुरतच्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अर्जुन यांना मृत घोषित केले.
पत्नी डॉली आणि तिच्या अल्पवयीन मुलाने हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सांगितले होते की, अर्जुन हे आठ दिवसांपूर्वी बाथरूममध्ये पडला होते, त्यांना दुखापत झाली होती. त्यानंतर मंगळवारी ते झोपले होते, त्यानंतर ते पुन्हा उठले नाहीत. दरम्यान, मृत अर्जुन यांच्या पत्नी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलाच्या सांगण्यावरून रुग्णालयातील डॉक्टरांना संशय आला आणि त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला.
शवविच्छेदन अहवालात अर्जुन यांचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची माहिती इच्छापोर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर १७ वर्षीय मुलाने पोलिसांना सांगितले की, दिवसभर मोबाइलवर गेम खेळत असे, त्यामुळे वडील गेम खेळण्यास सतत मनाई करत होते. त्यामुळे मंगळवारी झोपताना वडिलांचा गळा आवळून खून केला. दरम्यान, पोलिसांनी सध्या मृत अर्जुन सरकार यांच्या पत्नी डॉली आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाची पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.