ट्यूशन घेणाऱ्याने स्वतःला सांगितलं इस्रोचं शास्त्रज्ञ; घेतलं चंद्रयान-3 चं श्रेय, 'अशी' झाली पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 11:59 AM2023-08-30T11:59:17+5:302023-08-30T12:01:00+5:30
चंद्रयान-3 मोहिमेसाठी लँडर मॉड्यूल डिझाइन करणारे इस्रोचे शास्त्रज्ञ असल्याचा दावा गुजरातमधील या व्यक्तीने केला आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (ISRO) शास्त्रज्ञ असल्याच्या आरोपावरून मंगळवारी गुजरातमधील सुरतमध्ये एका खासगी शिक्षकाला अटक करण्यात आली. चंद्रयान-3 मोहिमेसाठी लँडर मॉड्यूल डिझाइन करणारे इस्रोचे शास्त्रज्ञ असल्याचा दावा गुजरातमधील या व्यक्तीने केला आहे. ज्यामध्ये सर्व काही खोटं असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला गुजरातमधील सुरत शहरातून अटक केली. पोलीस अधिकाऱ्यांनी आता ही माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने सुरतमध्ये प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली होती, स्वत: एक शास्त्रज्ञ असल्याचं सांगितलं होतं आणि दावा केला होता की चंद्रयान-3 या मोहिमेसाठी लँडर मॉड्यूल त्याने डिझाइन केलं होतं. मितुल त्रिवेदी असं या आरोपीचं नाव असून हा अंदाजे 30 वर्षांचा आहे आणि तो सुरत शहरात ट्यूशन घेत होता. अधिकाधिक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी इस्रोचा शास्त्रज्ञ असल्याचे दाखवत असे.
23 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 चे मॉड्यूल डिझाइन केल्याचा दावा करून विक्रम लँडर यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर त्रिवेदी स्थानिक माध्यमांना मुलाखत देत होता. त्यानंतर त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. अधिकाऱ्याने सांगितलं की, सखोल चौकशीत असे दिसून आले आहे की तो माणूस इस्रोच्या चंद्रयान-3 मोहिमेशी कोणत्याही प्रकारे संबंधित नव्हता आणि त्याने इस्रोचा कर्मचारी असल्याचा खोटा दावा केला होता.
महत्त्वाकांक्षी प्रकल्पात योगदान न देताही, त्याने इस्रोबद्दल खोटे मेसेज पसरवले, ज्यामुळे बंगळुरू-मुख्यालयाच्या संस्थेच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली. अतिरिक्त पोलिस आयुक्त शरद सिंघल यांनी सांगितले की, त्रिवेदी हे एक खासगी शिक्षक आहेत, जो आपल्या ट्यूशनसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी माध्यमांसमोर स्वतःला इस्रोचे शास्त्रज्ञ म्हणून सादर करायचा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.