कुटुंबातील ७ जणांच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा; आधी दूधातून विष दिलं, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 02:25 PM2023-10-30T14:25:35+5:302023-10-30T14:27:23+5:30
पोलिसांनी सर्व मृतदेह पोस्टमोर्टमसाठी सूरतच्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले होते.
सूरत – शहरातील सिध्देश्वर कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. मनिष सोलंकीने कुटुंबातील सदस्यांना गुंगीचे औषध खायला देऊन गळफास घेतला. परंतु वृद्ध आई आणि मुलीच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमधून त्या दोघींचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे समोर आले. सोलंकी कुटुंबानं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये जबाबदार लोकांचे नाव लिहिले नाही. त्यामुळे सामुहिक आत्महत्या का केली त्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
सूरत शहरातील पालनपूर भागात सिध्देश्वर कॉम्प्लेक्सच्या फ्लॅट नंबर जी १ मध्ये शनिवारी सकाळी इंटिरियर डिझाईनर मनिष सोलंकीसह पत्नी रिटा बेन सोलंकी, वडील कनु सोलंकी, आई शोभना सोलंकी, मुलगी दिशा सोलंकी, मुलगी काव्या सोलंकी आणि मुलगा कुशल सोलंकी यांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी सर्व मृतदेह पोस्टमोर्टमसाठी सूरतच्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले. जवळपास ४ तासानंतर पोस्टमोर्टम रिपोर्ट आला. या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला. त्यात मनिष सोलंकीशिवाय पत्नी, २ मुली आणि चिमुकला मुलगा, वृद्ध वडिलांच्या शरीरात विष आढळले त्याचसोबत मनिष सोलंकींची मोठी मुलगी आणि आईच्या गळ्यावर खूणा आढळल्या. त्यामुळे डॉक्टर पॅनेलने पोलिसांना हत्या झाल्याचा प्राथमिक रिपोर्ट दिला आहे.
हॉस्पिटलचे डॉक्टर केतन नायक यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी ७ मृतदेहांचे ३-४ तास पोस्टमोर्टम सुरु होते. मनिष सोलंकीने गळफास घेतला होता तर बाकी ६ मृतदेहांपैकी २ मृतदेहांच्या गळ्यावर खूणा आढळल्या आहेत असं त्यांनी सांगितले. इंटिरियर डिझाईनर मनिष सोलंकीने आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी, २ मुली, १ मुलगा आणि वृद्ध आईबापाला दूधात विष देऊन मारून टाकले. त्यानंतरही जीवित राहिलेल्या आई आणि मोठ्या मुलीचा गळा दाबला हा खुलासा प्राथमिक रिपोर्टमध्ये समोर आला आहे. त्याआधारे आयपीसी कलम ३०२ तहत एफआयआर गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.