सुशांत प्रकरण CBI कडे; आता मुंबई पोलिसांत ठपका कुणावर?... आयुक्त, तपास अधिकाऱ्यांवर टांगती तलवार
By पूनम अपराज | Published: August 19, 2020 07:19 PM2020-08-19T19:19:49+5:302020-08-19T19:26:25+5:30
सुशांतप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली जाणार असल्याची चर्चा देखील रंगली होती.
पूनम अपराज
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता मुंबई पोलीस दलात शीना बोरा हत्याकांडाप्रमाणे पोलीस अधिकाऱ्याची बदली होण्याबाबतच्या चर्चेला उधाण आलं आहे. १४ जून रोजी सुशांत गळफास लावून आत्महत्या केली, त्यानंतर वांद्रे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत याप्रकरणी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांचे जबाब नोंदवले. मात्र एफआयआर नोंदवला नाही. त्यानंतर एका आठवड्यांनी सुशांतचे वडील के के सिंग यांनी पाटणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली. त्यानंतर बिहार सरकारच्या शिफारशीनंतर केंद्राने सुशांत सिंगच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास परवानगी दिली. यानंतर महाराष्ट्र सरकारने आपलं म्हणणं ऐकून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केलं तर रियाने बिहार पोलिसांचा तपास मुंबई पोलिसांकडे हस्तातंरित करावा म्हणून याचिका केली. मात्र, सुप्रीम कोर्टाने रियाची याचिका फेटाळला असून सुशांतप्रकरणी तपास सीबीआयने करावा असा मोठा निर्णय दिला. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केली जात आहे. तसेच या सर्व प्रकरणात मुंबई पोलीस दलात वेगवेगळ्या हालचाली देखील सुरु झाल्या आहेत. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सुशांतप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली जाणार असल्याची चर्चा देखील रंगली होती.
सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणी तपास सीबीआयकडे दिल्याने खरंच मुंबई पोलीस कोणाला वाचवत आहेत का? असं वाटायला पुरेशी जागा निर्माण झाली आहे. मात्र, यामुळे मुंबई पोलीस आयुक्त आणि तपास अधिकारी यांच्यावर टांगती तलवार आहे. या प्रकरणी कोणावर ठपका ठेवला जाणार या चर्चेने जोर धरला आहे. शीना बोरा हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये गरजेपेक्षा अधिक लक्ष घातल्याने तसेच पीटर मुखर्जी याला वाचवत असल्याचा ठपका ठेवत त्यावेळी असलेले मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांना होम गार्ड विभागाचे पोलीस महासंचालक पदी बदली करण्यात आली होती. पोलीस दलातील ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मारिया ३१ जानेवारी २०१७ रोजी निवृत्त झाले होते. निवृत्तीवेळी ते पोलीस महासंचालक (होम गार्ड) या पदावर कार्यरत होते. त्यामुळे हायप्रोफाईल शीना बोरा प्रकरण पोलीस आयुक्तांवर शेकलं होतं.
दिशा सलियान हिने मालाड येथील घरातून उडी घेऊन आत्महत्या केल्याचं बोललं जातं आहे. साधारणतः कोणी आत्महत्या केली किंवा अकस्मात मृत्यू झाला तर पोलिस त्याची अपघाती मृत्यू (एडीआर) म्हणून नोंद करतात. सुशांत प्रकरणात पण सारखं पोलिसांनी केलं आहे. दोन्ही प्रकरणात पोलिसांनी अपघाती मृत्यू नोंदवलाय. एफआयआर किंवा गुन्हा नोंदवलेला नाही. सुशांतची माजी असिस्टंट मॅनेजर असलेल्या दिशाच्या मृत्यूनंतर सहाच दिवसांनी सुशांतही आत्महत्या करतो. या दोन्ही आत्महत्यांमध्ये काही तरी संबंध असू शकतो, अशी शंका पोलिसांना का आली नाही, हा अत्यंत साधा प्रश्न आता उपस्थित होतो. मात्र, सीबीआय आता सुशांतप्रकरणी दिशाच्या आत्महत्येचा सुशांच्या मृत्यूशी संबंध असल्यास पाळेमूळे शिधून काढू शकतं. सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या मृत्यूनंतर ११ दिवसांनी म्हणजेच २५ जूनला पाटण्यात एफआयआर दाखल केली आहे. नंतर या प्रकरणात पाटणा पोलिस मुंबईत तपासासाठी दाखलही झाले होते. पण त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं. त्यामुळेही पोलिसांकडे संशयाची सुई फिरत आहे. जर या प्रकरणात काहीच नाही किंवा केवळ अपघाती मृत्यू आहे, तर पाटणा पोलिसांनी तपासकामात मदत का केली नाही ? दुसरीकडे सुशांत प्रकरणात ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयानीही उडी घेतली आहे आणि त्यांचा तपास सुरु आहे. आता सीबीआयच्या तपासाची चक्रे फिरतील. सीबीआयच्या हाती काही ठोस लागलं. तर मात्र, स्कॉटलंड पोलिसांच्या नंतर नाव असलेल्या मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला जोरदार तडा जाऊ शकतो हे नक्की आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा ठपका आयुक्त की तपास अधिकारी यांच्यावर ठेवला जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.
मुंबई पोलीस दलातील वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निखिल कापसे, पोलीस निरीक्षक भूषण बेळणेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय भरगुडे, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या हातात सुशांतच्या मृत्यूच्या तपासाची सूत्रे आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर
दाऊदच्या हस्तकाने केला मोठा खुलासा, नेपाळमधून भारतात पाठवत होता नकली सोनं अन् नोटा
सेक्स रॅकेटचा भांडाफोड, युनिसेक्स स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय अन् आक्षेपार्ह वस्तू सापडल्या
सुशांत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली प्रतिक्रिया