'रियानेच सुशांतला ड्रग्सच्या आहारी जाण्यास भाग पाडलं', NCB च्या चार्जशीटमध्ये गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 11:48 AM2022-07-13T11:48:29+5:302022-07-13T12:17:03+5:30
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई ।
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (Narcotics Control Bureau) दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात महत्वाची नोंद केली आहे. सुशांतची गर्लफ्रेंड राहिलेल्या रिया चक्रवर्तीला तिच्या सहकलाकारांकडून आणि भाऊ शोविक यांच्याकडून अमली पदार्थांचा पुरवठा होत होता. जो ती सुशात सिंग राजपूतला देत होती, असं एनसीबीच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीने ३५ आरोपींविरूद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत न्यायालयात खटला दाखल केला होता. आरोपपत्रात नमूद माहितीनुसार मार्च २०२० पासून त्याच वर्षाच्या डिसेंबर महिन्यादरम्यान सर्व आरोपी गुन्हेगारी कटाचा भाग होते. विशेष म्हणजे हे सर्वजण कोणत्याही वैध परवान्याशिवाय प्रतिष्ठित लोकांना आणि बॉलीवूड मधील मंडळींना ड्रग्जची विक्री करत होते.
सुशांतच्या पैशांवर रियाकडून ड्रग्जची खरेदी
आरोपपत्रात नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्तीलाअमली पदार्थांची अनेक पाकीटं सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत आणि इतरांकडून मिळत होती. यासाठी रियाने अभिनेता सुशांत सिंग आणि भावाच्या माध्यमातून पैसे जमा केले होते. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती नियमितपणे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या संपर्कात असल्याचंही आरोपत्रात नमूद करण्यात आलं आहे. गांजा आणि चरस यांची ऑर्डर दिली जात होती आणि हे सर्व ड्रग्ज सुशांतला दिले जात होते अशीही नोंद करण्यात आली आहे.
सुशांतच्या मृत्यूने माजली होती खळबळ
सुशांत सिंग राजपूत १४ जून रोजी २०२० रोजी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतच्या आकस्मित निधनामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती. कोणालाच बॉलिवूड स्टारच्या मृत्यूवर विश्वास बसत नव्हता. लक्षणीय बाब म्हणजे सुशांतच्या कुटुंबियांनी अभिनेत्याच्या मृत्यूस रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचा आरोप केला होता.