सुशांतनेच स्वप्नात येत मौन सोडण्यास सांगितले; ८ जूनला काय घडलं? रियाचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 02:55 AM2020-08-28T02:55:04+5:302020-08-28T06:49:34+5:30
मनी लॉड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रिया चक्रवर्तीचे काही व्हॉट्सअॅप मेसेज समोर आणले आहेत.
मुंबई : सुशांतच्या मृत्यूप्रकरणात रिया चक्रवर्तीचे ड्रग्ज कनेक्शन समोर येत असतानाच, दोन महिन्यांनी तिने प्रसारमाध्यमांसमोर मौन सोडले. ‘मला नव्हे, तर सुशांतला ड्रग्जचे व्यसन लागले होते. मी नेहमीच त्याला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला’, असा खुलासा तिने केला.
मनी लॉड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रिया चक्रवर्तीचे काही व्हॉट्सअॅप मेसेज समोर आणले आहेत. रियाने डिलीट गौरव आर्या, जया सहासोबतच्या डिलिट केलेल्या व्हॉट्सअॅप संवादातून ड्रग्ज कनेक्शन उघड झाले. मात्र हे सर्व आरोप फेटाळून, आपण कधीच ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे रियाने नमूद केले. व्हॉट्सअॅप चॅटनुसार, २०१७ मधील संवादात रियाने गौरव आर्यासोबत एमडी घेण्याची इच्छा व्यक्त केलेल्या मेसेजबाबत खुलासा करताना आपण कुठलीच मागणी केली नसल्याचे रियाचे म्हणणे आहे. २०१९ मध्ये चहात सीबीडीचे चार थेंब टाकण्याबाबत जयाने सल्ला दिला होता. सुशांतनेच जयासोबत संपर्क करत ते औषध घेतल्याचे नमूद केले होते, असे रिया म्हणाली.
सुशांतनेच स्वप्नात येत मौन सोडण्यास सांगितले
मला माझे साधे पूर्वीचे आयुष्य जगायचे आहे. मोकळा श्वास घ्यायचा आहे. पण मी लढणार. आज सुशांत स्वप्नात आला. त्यानेच मला आवाज उठवण्यास सांगितल्याने मी माध्यमांसमोर आले.
आईच्या निधनानंतर तणावात पडली भर
सुशांतच्या वडिलांनी लहानपणीच त्याला आईपासून दूर केले. त्यात आईच्या निधनानंतर तो आणखी तणावात गेला. पाच वर्षे वडिलांना तो भेटला नसल्याचे रिया म्हणाली.
८ जूनला काय घडले?
रियाच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनमुळे सुशांत जास्त खचला. मी नेहमीच त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यात माझीही तब्येत बिघडत चालल्याने सुशांतने मला घरी जाण्यास सांगितले. ८ जून रोजी माझी थेरेपी असल्याने ती पूर्ण करून जाते असे सांगूनही तो मला जा म्हणाला. त्याची बहीण येणार असल्याचे तो म्हणाला. ९ जूनला फक्त तब्येत कशी आहे? असा सुशांतचा संदेश आला. १० जूनला त्याने शोविककडे तब्येतीची चौकशी केली.