सुशांत राजपूत: आदित्य ठाकरेंवर कथित आरोप; दिल्लीच्या वकिलाला ठोकल्या बेड्या
By हेमंत बावकर | Published: October 17, 2020 12:20 PM2020-10-17T12:20:57+5:302020-10-17T12:21:56+5:30
Sushant singh Rajput, Disha Salian Case: आनंदने कथितरित्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सुशांत आणि दिशाच्या मृत्यूशी संबंध जोडणाऱ्या वक्तव्याचा व्हिडीओ यूट्यूबवर पोस्ट केला होता.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यूबाबत खोट्या बातम्या पसरविणाऱ्या एका वकिलाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने थेट दिल्लीचा वकील विभोर आनंद याला ताब्यात घेतले आहे. आनंद वकील असल्याचा दावा करत आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी युवासेना नेते आदित्य ठाकरे (aditya thackeray) आणि अन्य बाबतीत वादग्रस्त पोस्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याचे त्याच्यावर आरोप आहेत. आनंदचे ट्विटर अकाऊंटही सस्पेंड केले आहे.
आनंदने कथितरित्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सुशांत आणि दिशाच्या मृत्यूशी संबंध जोडणाऱ्या वक्तव्याचा व्हिडीओ यूट्यूबवर पोस्ट केला होता. आनंदच्या या व्हिडीओमध्ये दिशा सालियानची हत्या होण्याआधी तिच्यावर सामुहिक बलात्कार झाल्याचा दावा केला होता. आनंदने या प्रकरणी बॉलिवूडचे अनेक लोक आणि महाराष्ट्रातील एका नेत्याचे नाव घेतले होते.
9 जूनला झालेला दिशाचा मृत्यू
पोलिसांनी केलेली कारवाई ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या बातम्या पसरविणे आणि विद्वेशक पोस्ट करणे यावर असल्याचे सांगितले जात आहे. दिशा सालियनने मुंबईतील मालाडच्या एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या ईमारतीमध्ये तिचा होणारा नवरा राहत होता.
19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
पोलिसांनी सांगितल्यानुसार शहर न्यायालयाकडून इशारा दिल्यानंतरही विभेर आनंद (31) सतत सोशल मीडियावर खोटे आणि वाटेलतसे पोस्ट लिहत होता. तसेच यामध्ये अनेक व्यक्तींवर गंभीर आरोप करत होता. पोलिसांनी त्याला दिल्लीतील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्याला मुंबईत आणण्यात आले. विभोरला 19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंदच्या वकिलाने सांगितले की, पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हा राजकारणातून प्रेरित आहे. माझ्या अशिलाने केवळ त्याचे विचार व्यक्त केले होते. बॉम्बे सिव्हील कोर्टाने वादग्रस्त पोस्ट हटविण्याचा आदेश दिला होता.