सुशांतच्या खात्यातून 17 नाही, 50 कोटी काढले; बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 11:34 AM2020-08-04T11:34:00+5:302020-08-04T11:56:57+5:30
रिया चक्रवर्तीने सुशांतच्या खात्याततून करोडो रुपये काढले आहेत. मुंबई पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बिहारच्या डीजीपींनी केला आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे देशातील राजकीय तसेच प्रशासकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरुच असून रिया चक्रवर्तीने केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या चौकशीसाठी ईडीनेच लक्ष घातले आहे. याचवेळी बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.
रिया चक्रवर्तीने सुशांतच्या खात्याततून करोडो रुपये काढले आहेत. मुंबई पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बिहारच्या डीजीपींनी केला आहे. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून त्याआधी बॉलिवूडमधील गटबाजीमुळे सुशांतने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात होते. मात्र, सुशांतच्या वडिलांनी रियाने करोडो रुपयांची अफरातफर केल्याचा तसेच सुशांत मानसिकदृट्या आजारी असल्याचे सर्वांना सांगण्याची धमकी दिल्याची माहिती बिहार पोलिसांना दिली. यानंतर मुंबई पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते.
बिहारचे डिजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांना प्रश्न विचारला आहे. त्यांनी सुशांत प्रकरणाच्या चौकशीवेळी त्याच्या पैशांवरून तपास का नाही केला, असा सवाल केला आहे. पांडे हे असे अधिकारी आहेत जे आपले मत कोणताही मुलाहिजा न राखता मांडत असतात. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, गेल्या चार वर्षांमध्ये सुशांतच्या खात्यात जवळपास 50 कोटी रुपये आले होते. हैरान करणारी गोष्ट म्हणजे हे सर्व पैसे काढण्यात आले. एका वर्षातच 17 कोटी रुपये आले आणि त्यातील 15 कोटी रुपये काढण्यात आले. हे तपास करण्य़ासाठी पुरेसे कारण नाही का? आम्ही शांत बसणाऱ्यांमधील नाही. आम्ही मुंबई पोलिसांनी प्रश्न विचारणार आहोत. अशा प्रकारच्या मोठ्या मुद्द्यांना का दाबले जात आहे?
क्वारंटाईनवरून रंगले राजकारण...
सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी आणि बिहार शहर पूर्वचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेने त्यांना क्वारंटाईन केलं आहे. बिहार पोलिसांनी तिवारी यांना जबरदस्तीने क्वारंटाईन केल्याचा आरोप केला आहे. मात्र यावर आता मुंबई महापालिकेने विनय तिवारी यांचे क्वारंटाईन योग्यच असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच राज्य सरकारच्या नियमावलींचा हवाला देखील दिला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आताच बिहार पोलीस विरुद्ध मुंबई पोलीस असे वळण लागले असून, बिहारमधील सर्व राजकारणीही या प्रकारची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करून लागले आहेत. बिहारमधील सर्व राजकारणी आणि पोलीसही मुंबई पोलिसांच्या तपासाविषयी शंका उपस्थित करून लागले आहेत. बिहारमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार असल्याने, यानिमित्ताने एकमेकांवर कुरघोडी करण्याचे सर्व राजकारण्यांचे प्रयत्न सुरू आहेत.