सुशांतसिंह राजपूत ड्रग्स प्रकरण; रियासह ३३ जणांवर दोषारोपपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 06:42 AM2021-03-06T06:42:02+5:302021-03-06T06:42:26+5:30
गेल्या वर्षी या प्रकरणाचा तपास सुरू झाला. अनेक अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मोबाइल फोनही जप्त करण्यात आले. अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील माहिती मोबाइलमधून घेण्यात आली, असे दोषारोपपत्रात म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोल (एनसीबी)ने शुक्रवारी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. दोषारोपपत्रात ३३ आरोपींची नावे नमूद करण्यात आली. त्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे.
एनसीबीचे मुख्य समीर वानखेडे यांनी स्वतः विशेष न्यायालयात ११,७०० पानांचे दोषारोपपत्र सादर केले. जप्त केलेले ड्रग्स आणि आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती आहे. तसेच २०० साक्षीदारांची नावेही आहेत. एकूण ३३ आरोपींपैकी अद्याप आठ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत, तर रिया आणि शोविक जामिनावर सुटले आहेत. अनेक ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींबाबत तपास सुरू आहे, असे एनसीबीने सांगितले.
गेल्या वर्षी या प्रकरणाचा तपास सुरू झाला. अनेक अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मोबाइल फोनही जप्त करण्यात आले. अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील माहिती मोबाइलमधून घेण्यात आली, असे दोषारोपपत्रात म्हटले आहे.
आरोपींकडून जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ, आरोपींनी स्वतःहून दिलेली माहिती, तांत्रिक पुरावे, उदा. मोबाइल कॉल्स, व्हाॅट्सॲप चॅट, बँक खात्यांची माहिती, आर्थिक व्यवहार आणि अन्य कागदोपत्री पुरावे विचारात घेऊन खोलवर तपास करण्यात आला, असे तपास यंत्रणेने सांगितले.
तपासादरम्यान देशी, परदेशी चलन जप्त करण्यात आले आणि संबंधित कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. पर्यावरणाचा विचार करून अंदाजे ५०,००० पानांचे दोषारोपपत्र इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये न्यायालयात सादर करण्यात आले. तपास पुढे सरकल्यावर पुरवणी दोषारोपपत्र सादर करू, असे एनसीबीने सांगितले.