Sushant Singh Rajput: सुशांतच्या मृत्यूचा तपास बॉलिवूडच्या दिशेने;‘यशराज फिल्म’कडे मागितली कागदपत्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 11:46 PM2020-06-18T23:46:29+5:302020-06-19T07:15:21+5:30
गुरुवारी पोलिसांनी या प्रकरणात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिचा जबाब नोंदवला तसेच सुशांतच्या घरातून ५ डायऱ्या ताब्यात घेतल्या असून त्याचा तपास करण्यात येणार आहे.
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेकजण बॉलिवूडच्या घराणेशाहीवर टीका करत आहे, काहींनी या प्रकरणाची थेट कोर्टात तक्रार नोंदवली आहे, करण जोहर, सलमान खान, आलिया भट्टसारख्या कलाकारांना नेटीझन्सकडून ट्रोल करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनीही सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची कारणं शोधण्यासाठी तपासाचा वेग वाढवला आहे.
गुरुवारी पोलिसांनी या प्रकरणात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिचा जबाब नोंदवला तसेच सुशांतच्या घरातून ५ डायऱ्या ताब्यात घेतल्या असून त्याचा तपास करण्यात येणार आहे. त्याचसोबत पोलिसांनी यशराज फिल्मला पत्र लिहून सुशांत राजपूतसोबत केलेल्या सिनेमा कराराच्या कॉपी मागवल्या आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, यशराज फिल्मसोबत सुशांतने किती सिनेमा साईन केले होते, त्याचा तपास करण्यात येणार आहे. सुशांतने यशराजच्या २ सिनेमात काम केले होते.
गुरुवारी पोलिसांनी सुशांत राजपूतची पीआर मॅनेजर राधिका निहलानी आणि माजी व्यावसायिक मॅनेजर श्रुती मोदी यांचाही जबाब नोंदवला. श्रुती मोदी ही सुशांत राजपूतसोबत जुलै २०१९ पासून काम करत होती. फेब्रुवारी महिन्यात चिंछोरे या सुशांतच्या शेवटच्या सिनेमात रिलीज होईपर्यंत काम केले.
श्रुती मोदी हिने पोलिसांना सांगितले की, सुशांत नेशन इंडिया फॉर वर्ल्ड या नावाची कंपनी सामाजिक कामासाठी नोंद करणार होता. याद्वारे तो आपत्ती मदत, वृक्षारोपन मोहीम काम करणार होता. पोलिसांनी मंगळवारी सुशांतचे वडील व दोन बहिणी, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा, नोकर अशा १२ जणांचा जबाब नोंदवला आहे.
सुशांत सकाळी साडे सहा वाजता उठला. ९ वाजता त्याने ज्यूस पिऊन साडे नऊच्या सुमारास बहिणीला दूरध्वनी केला होता. साडे दहाच्या सुमारास सुशांत पुन्हा त्याच्या खोलीत गेला. तो बाहेर आलाच नाही. ११ च्या सुमारास त्याच्या नोकराने त्याला पुन्हा जेवणासाठी विचारले. मात्र त्याच्या खोलीतून कोणतंही प्रतिउत्तर आलं नाही. १२ वाजले तरी सुशांत रुम बाहेर न आल्याने पून्हा नोकर त्याला उठवायला गेला. मात्र तरी सुशांत खोलीतून कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे नोकराने सुशांतसोबत राहणारा त्याचा मित्र सिद्धार्थ याला सांगितले. सिद्धार्थ हा आर्टीस्ट आहे. त्याने सुशांतला फोनकेले मात्र सुशांत फोन ही घेत नव्हता. मग सिद्धार्थने त्याच्या गोरेगाव येथे राहणाऱ्या बहिणीला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याने चावीवाल्याला बोलावले. चावीवाल्याने बनावट चावीने दरवाजा उघडल्यानंतर सुशांतने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात सुशांतची बहिण, २ मॅनेजर, स्वयंपाकी, चावीवाला आणि त्याचा जवळचा मित्र महेश शेट्टी याच्याशी बोलून पोलिसांनी सर्व घटनाक्रम समजावून घेतला आहे.