Sushant Singh Rajput: रियावर अटकेची टांगती तलवार, पिठानीवर प्रश्नांचा भडिमार; दहा तास झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 07:26 IST2020-08-29T02:41:47+5:302020-08-29T07:26:33+5:30
सीबीआयने रियाचा भाऊ शोविकचा गुरुवारी जबाब नोंदविल्यानंतर आता रियाकडे मोर्चा वळविला आहे.

Sushant Singh Rajput: रियावर अटकेची टांगती तलवार, पिठानीवर प्रश्नांचा भडिमार; दहा तास झाडाझडती
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष पथकाने सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या भोवती आता चौकशीचा फास आवळला असून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तिची झाडाझडती घेतली. तब्बल १० तास तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. रियाने दिलेल्या माहितीवर चौकशी पथकाचे समाधान झाले नाही, तर तिला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
सीबीआयने रियाचा भाऊ शोविकचा गुरुवारी जबाब नोंदविल्यानंतर आता रियाकडे मोर्चा वळविला आहे. शुक्रवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास सांताक्रुझ येथील डीआरडीओ गेस्ट हाउस येथे तिची चौकशी सुरू केली. पोलीस अधीक्षक नूपुर प्रसाद आणि अनिल यादव यांनी रियावर प्रश्नांची सरबत्ती केली.
८ जूनला नेमके काय झाले, याबाबत माहिती घेतली. बँक तपशिलासह, युरोप दौऱ्यासह विविध टूरबाबत तिच्याकडे चौकशी सुरू आहे. तसेच ड्रग कनेक्शनबाबतही अधिक तपास सुरू आहे. तर दुसरीकडे सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याचीही सलग सातव्या दिवशी सीबीआयकड़ून चौकशी करण्यात आली. रियासोबत आलेला तिचा भाऊ शोविक याचीही विचारपूस करण्यात आली आहे.