सुशांत आत्महत्या: आरोपींच्या आवाजाची होणार तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 08:20 AM2023-02-18T08:20:25+5:302023-02-18T08:20:47+5:30
संबंधित आठ आरोपींमधील व्हॉइस चॅट जप्त केले असून, त्यांचा गुन्ह्यातील सहभाग आणि भूमिका समजण्यासाठी आवाजाचे नमुने घेण्याची परवानगी द्यावी, असे एनसीबीने अर्जात म्हटले होते
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर कथित ड्रग्ज प्रकरणासंदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आठ आरोपींच्या आवाजाचे नमुने रेकॉर्ड करण्याची मागणी केली होती. दोन वर्षांनी विशेष न्यायालयाने एनसीबीचा हा अर्ज गेल्या आठवड्यात मंजूर केला. काही कॉल्सचा तपास करण्यासाठी आठ आरोपींच्या आवाजाचे नमुने घेण्याची परवानगी मिळावी, यासाठी एनसीबीने २०२१ मध्ये विशेष न्यायालयात अर्ज केला होता. संबंधित आठ आरोपींमधील व्हॉइस चॅट जप्त केले असून, त्यांचा गुन्ह्यातील सहभाग आणि भूमिका समजण्यासाठी आवाजाचे नमुने घेण्याची परवानगी द्यावी, असे एनसीबीने अर्जात म्हटले होते.
या आठ आरोपींमध्ये करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची उपकंपनी धर्माटिक एंटरटेन्मेंटचे माजी कार्यकारी निर्माते क्षितिज प्रसाद, अनुज केशवानी, संकेत पटेल, जिनेंद्र जैन, अब्बास लखानी, जैद विलात्रा, ख्रिस परेरा आणि करमजीत सिंग यांचा समावेश आहे. एनसीबीच्या या अर्जाला आरोपींच्या वकिलांनी विरोध केला. मात्र, न्यायालयाने आरोपींना तपास यंत्रणेला आवाजाचे नमुने देण्याचे आदेश दिले.