हत्येचे नाट्यरूपांतर करून सुशील कुमारची चौकशी, छत्रसाल स्टेडियममध्ये ठोस पुरावे शोधण्याचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 08:36 AM2021-05-26T08:36:20+5:302021-05-26T08:36:58+5:30
Sushil Kumar News: पोलिसांनी सुशीलला सकाळी घटनास्थळी नेले. दुपारपर्यंत पोलिसांनी घटनेच्या दिवशी नेमके काय घडले असावे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
नवी दिल्ली : २३ वर्षांच्या युवा मल्लाच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेला ऑलिम्पिक पदक विजेता सुशीलकुमार याला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी छत्रसाल स्टेडियम परिसरात नेले. त्याच्या उपस्थितीत हत्येचे नाट्यरूपांतर करण्यात आले. याद्वारे ठोस पुरावे शोधण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सुशीलला सहकारी अजयसह रविवारी दिल्लीच्या मुंडका भागातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सुशीलला सकाळी घटनास्थळी नेले. दुपारपर्यंत पोलिसांनी घटनेच्या दिवशी नेमके काय घडले असावे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याआधी सोमवारी (दि. २४) चार तास सुशीलकडून माहिती घेण्यात आली. घटना घडल्यानंतर सुशील कुठे-कुठे गेला होता, हेदेखील जाणून घेतले. सुशीलला सहकारी मित्रांबाबत विचारपूस करण्यात आली. चार आणि पाच मे रोजीच्या मध्यरात्री सुशील आणि त्याच्या मित्रांनी केलेल्या हल्ल्यात सागर नावाच्या मल्लाचा मृत्यू झाला; शिवाय त्याचे काही सहकारी गंभीर जखमी झाले होते. मॉडेल टाऊन येथील फ्लॅटचा ताबा घेण्याच्या वादातून हा प्रकार घडला होता.
उत्तर रेल्वेतून सुशील निलंबित
उत्तर रेल्वेने सुशीलच्या निलंबनाचे मंगळवारी आदेश काढले. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक या पदावर कार्यरत सुशील २०१५ पासून दिल्ली सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर होता. छत्रसाल स्टेडियममध्ये तो विशेष कार्य अधिकारी होता. सुशीलला २३ मेपासून निलंबित मानले जाईल, असा आदेश उत्तर रेल्वेने काढल्याची माहिती प्रवक्ते दीपक कुमार यांनी दिली.
डोक्यावर बोथट वस्तूने वार
जहांगीरपुरी येथील बीजेआरएमएच रुग्णालयाचे डॉ. मुनीष वाधवन यांच्या अहवालानुसार तपासणीसाठी व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने सील करण्यात आले आहेत. डोक्यावर बोथट वस्तूने वार केल्यामुळे सागरचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या मते शरीरावर आढळलेल्या सर्व खुणा मृत्यूच्या अगोदरच्या आहेत.