सुश्मिता सेनला प्राप्तिकर प्रकरणात दिलासा; न्यायाधिकरणाचा निवाडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 03:07 AM2018-11-21T03:07:49+5:302018-11-21T03:08:20+5:30
सुश्मिताने प्रमोशनचे काम करताना कोका कोला कंपनीच्या अधिका-याने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला व यामुळेच काम बंद केल्याचे सांगितले.
मुंबई : एखाद्या व्यक्तीस लैंगिक छळाबद्दल मिळालेली भरपाईची रक्कम उत्पन्नात मोडत नाही. त्यामुळे अशा रकमेवर प्राप्तिकरही लागू होत नाही, असा निवाडा देत प्राप्तिकर अपिली न्यायाधिकरणाने चित्रपट अभिनेत्री व मॉडेल सुश्मिता सेन हिला गेली १५ वर्षे सुरु असलेल्या वादात दिलासा दिला आहे.
सन २००२-०३ मध्ये सुश्मिता सेनला कोका कोला कंपनीकडून १.४५ कोटी मिळाले. पुढील वर्षाचे प्राप्तिकराचे रिटर्न भरताना सुश्मिताने ५० लाख रुपये उत्पन्नात दाखविले. कर निर्धारण अधिकाऱ्याने रिटर्न अमान्य करून प्राप्तिकर भरायला सांगण्याखेरीज सुश्मिताला ३५ लाखांचा दंडही लावला.
याविरुद्ध सुश्मिताने केलेल्या अपिलावर प्राप्तिकर अपिली न्यायाधीकरणाच्या शक्तिजीत डे व मनोज कुमार अगरवाल यांच्या खंडपीठाने काही दिवसांपूर्वी निकाल दिला. संबंधित वर्षातील जास्तीची करआकारणी व दंड रद्द केला.
१.५० कोटीपैकी एक कोटी दिल्यावर तिने कराराचे पालन करत नसल्याचा आरोप करून कंपनीने करार एकतर्फी रद्द केला. एक कोटी रुपये परत करण्याची मागणी केली. सुश्मिताने प्रमोशनचे काम करताना कोका कोला कंपनीच्या अधिका-याने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला व यामुळेच काम बंद केल्याचे सांगितले. कालांतराने दोघांत समेट झाला. कंपनीने तिला दिलेले एक कोटी परत मागण्याऐवजी उलट तिलाच १.४५ कोटी देऊन प्रकरण मिटवले.
निकालात काय म्हटले?
न्यायाधिकरणाने म्हटले की, करारानुसार सुश्मिताला कोका कोला कंपनी आणखी फक्त ५० लाख रुपयेच देणे लागत होती. असे असताना करारभंगाबद्दल दिलेले एक कोटी रुपयेही परत मागणाºया कंपनीने सुश्मिताला १.४५ कोटी रुपये देऊन समेट केला यावरून स्पष्ट दिसते की, ५० लाखांहून जास्तीचे ९५ लाख रुपये कंपनीने सुश्मिताला तिने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपाची मांडवली करण्यासाठी दिले होते. त्यामुळे या १.४५ कोटीपैकी फक्त ५० लाख त्या वर्षात सुश्मिताच्या व्यावसायिक उत्त्पन्नाच्या खाती धरायला हवेत. बाकीचे ९५ लाख भरपाईपोटी मिळाल्याने ते उत्त्पन्नात येत नाहीत व त्यावर प्राप्तिकरही लागू होत नाही.