सुप्रिया शिंदेच्या हत्येप्रकरणी संशयित ताब्यात; पोलिसांचे मौन, आज उकल होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 11:05 AM2022-02-18T11:05:02+5:302022-02-18T11:05:20+5:30
सुप्रियाचा मृतदेह तिच्याच घरातील सोफाकम बेडमध्ये मंगळवारी दावडी परिसरातील ओम रेसिडेन्सी बिल्डिंगमध्ये आढळला होता.
डोंबिवली : सुप्रिया शिंदे या ३३ वर्षांच्या तरुणीच्या हत्येप्रकरणी तिच्या परिचयातील एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या परिचिताने ही हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, शुक्रवारी याबाबतचा उलगडा होईल, असे संकेत पोलिसांनी दिले.
सुप्रियाचा मृतदेह तिच्याच घरातील सोफाकम बेडमध्ये मंगळवारी दावडी परिसरातील ओम रेसिडेन्सी बिल्डिंगमध्ये आढळला होता. मानपाडा पोलीस ठाण्यात सुप्रियाचा पती किशोर याच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. सुप्रियाच्या डोक्यावर प्रहार करून व गळा आवळून तिची हत्या केली. मुलगा शाळेत गेल्यानंतर दुपारी साडेबारा ते संध्याकाळी साडेपाच या कालावधीत सुप्रिया घरात एकटी होती. त्याचवेळी तिची हत्या झाली. सुप्रियाचा मोबाईल घटनास्थळावरून गायब झाला असून, मोबाइलचा सीडीआर रिपोर्ट पोलिसांनी मागवला होता. दरम्यान, बुधवारी एकाला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले.
बंदोबस्तात पोलीस व्यस्त
हत्येच्या गुन्ह्याची उकल केल्याबाबत मानपाडा पोलिसांकडून गुरुवारी माहिती दिली जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु गुरुवारी विकासकामांच्या शुभारंभासाठी मंत्रिगण डोंबिवली दौऱ्यावर असल्याने त्या बंदोबस्तात पोलीस व्यस्त होते. त्यामुळे शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन गुन्ह्याच्या छड्याची माहिती दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.