महिला कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू; ‘फेसबुक’वर झाली होती नायब तहसीलदाराशी मैत्री, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 08:59 AM2022-02-21T08:59:55+5:302022-02-21T09:00:18+5:30
१३ फेब्रुवारीपासून महिला कॉन्स्टेबल ड्युटीवर हजर झाली नव्हती. त्यांच्यासोबतच्या महिला सहकाऱ्यांनी तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु रुची सिंह यांचा फोन सातत्याने स्वीच ऑफ लागत होता.
लखनौ – उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका महिलेचा संशयास्पद मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली आहे. पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या रुची सिंहच्या मृत्यूनं सर्वांना धक्का बसला आहे. पोलीस तपासात या गोष्टीचा खुलासा झाला. प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याचा संशय आहे. फेसबुकच्या माध्यमातून महिला कॉन्स्टेबलची मैत्री नायब तहसिलदारासोबत झाली होती. या प्रकरणाचा छडा लावण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारीपासून महिला कॉन्स्टेबल ड्युटीवर हजर झाली नव्हती. त्यांच्यासोबतच्या महिला सहकाऱ्यांनी तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु रुची सिंह यांचा फोन सातत्याने स्वीच ऑफ लागत होता. त्यानंतर याबाबत तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर या महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह कालीमाता परिसरातील नाल्याजवळ आढळून आला. स्थानिकांनी पोलिसांना याबाबत कळवलं. तेव्हा रुची सिंहसोबत काम करणाऱ्या सहकारी घटनास्थळी पोहचल्या आणि मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर रुची सिंह यांच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली.
नायब तहसिलदार होता विवाहित
ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याचा अंदाज आहे. महिला कॉन्स्टेबल रुची सिंह विवाहित होती. तिचं सहकारी कॉन्स्टेबलसोबत लग्न झालं होतं. सध्या तो कुशीनगर येथील कार्यक्षेत्रात तैनात आहे. मात्र दरम्यानच्या काळात प्रतापगडच्या रानीगंज येथील नायब तहसिलदारासोबत फेसबुकच्या माध्यमातून रुची सिंहची मैत्री झाली. त्यानंतर दोघांमधील बोलणं वाढलं. मागील ५ वर्षापासून ते दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. नायब तहसिलदारही विवाहित असल्याचं समोर आलं. परंतु महिला कॉन्स्टेबल नायब तहसिलदारावर लग्नासाठी दबाव टाकत होती.
नायब तहसिलदाराला ताब्यात घेत चौकशी
या प्रकरणात नायब तहसीलदाराला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस कॉन्स्टेबल रुची सिंह हिची हत्या करुन मृतदेह नाल्यात फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र त्याबाबत ठोस पुरावे सापडले नाहीत. परंतु लखनौ पोलीस या घटनेचा शोध घेत असून नेमकं रुची सिंहचा मृत्यू कसा आणि कधी झाला? तिचा मृतदेह नाल्यात कुणी फेकला? याबाबतचं गूढ रहस्य पोलीस उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र रुची सिंहच्या अचानक जाण्यानं तिच्या सहकारी पोलीस मैत्रिणींना धक्का बसला आहे.