दीड वर्षाच्या बाळाचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी पुरलेला मृतदेह तपासणीसाठी काढला बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 06:18 AM2021-05-17T06:18:44+5:302021-05-17T06:18:58+5:30
बेपत्ता झालेल्या महिलेच्या बाळाचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने रविवारी पैठण पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत त्या बाळाचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पैठणच्या शासकीय रुग्णालयात हलवला.
पैठण : शहरातील नवीन कावसान भागातून शुक्रवारी बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेच्या दीड वर्षाच्या बाळाचा त्याच दिवशी मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आई बेपत्ता झाल्यानंतर या बाळाचा अंत्यविधी नातेवाइकांनी परस्पर उरकून घेत पोलिसांना फक्त घरातून विवाहिता बेपत्ता असल्याची माहिती दिली होती.
बेपत्ता झालेल्या महिलेच्या बाळाचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने रविवारी पैठण पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत त्या बाळाचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पैठणच्या शासकीय रुग्णालयात हलवला. शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणातील बऱ्याच गोष्टी समोर येणार असल्याची शक्यता आहे.
नवीन कावसान भागात रवी कासोदे हे घरजावई म्हणून राहतात. रवी कासोदे यांचे शुक्रवारी पत्नी वैष्णवीसोबत भांडण झाले. रागारागात रवी मोठ्या मुलाला घेऊन वाघाडी येथे कामावर निघून गेला. दरम्यान, शनिवारी रवी कासोदे यांनी वैष्णवीच्या आईवडिलांसह पैठण पोलीस ठाण्यात येऊन वैष्णवी बेपत्ता झाल्याची माहिती पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणाची चौकशी करताना पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांना वैष्णवीच्या दीड वर्षांच्या बाळाचा मृत्यू व वैष्णवी घरातून बेपत्ता झाल्याची घटना शुक्रवारीच घडल्याचे लक्षात आले.
बाळाचा मृत्यू कसा झाला हे सांगताना वैष्णवीच्या घरच्या लोकांच्या देहबोलीतून संशय आल्याने शवविच्छेदन करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्यानंतर नायगाव फाटा येथे पुरलेल्या त्या बाळाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पैठणच्या शासकीय रुग्णालयात हलवला. बाळाचा मृत्यू कसा झाला हे सांगताना घरच्या लोकांच्या देहबोलीतून संशय आल्याने तो पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढून शवविच्छेदन करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.