संशियत दहशतवादी प्रकरण; चौघांना वसई कोर्टाने ठोठावला दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 01:06 PM2019-06-01T13:06:35+5:302019-06-01T13:08:37+5:30
निर्देश न पाळल्याने नालासोपारा पोलिसांनी चार लोकांवर गुन्हा दाखल केला होता.
मंगेश कराळे
नालासोपारा - नालासोपारा पश्चिमेकडील गास परिसरातील सनसिटी येथे कोणतेही शिर्षक नसलेल्या हिंदी चित्रपटाचे शुटींग सुरू असल्याने रीतसर पोलिसांकडून परवानगी घेतली होती. मात्र, निर्देश न पाळल्याने नालासोपारा पोलिसांनी चार लोकांवर गुन्हा दाखल केला होता. त्या चौघांना गुरुवारी वसई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दंड ठोठावला आहे.
सोमवारी दुपारच्या सुमारास वसई पश्चिमेकडील पंचवटी नाका येथे लांब दाढी, रंग गोरा, आर्मीसारखे टीशर्ट, काळी पॅन्ट, तोंडाला रुमाल, पोटावर मॅगझिनसारखे दिसणारे पॉकेट, हातावर आयसिसच्या झेंड्यामधील असलेले पान अशा वेशभूषेतील दहशतवादीसारखा दिसणारा संशियत तरुण दिसल्यानंतर संपूर्ण पालघर जिल्ह्यासह वसई तालुक्यात खळबळ झाली होती. अंबाडी रोडवरील भारत बँकेचे सुरक्षा रक्षक अनिल रामदास महाजन यांनी त्याला पाहिले व पालघर कंट्रोलमध्ये कळवल्यानंतर संपूर्ण पालघर जिल्ह्यातील पोलिसांनी एक तास फिल्मी स्टाईलने धावपळ करत सत्य परिस्थिती लोकांसमोर उघडकीस आणली व सुटकेचा श्वास पोलिसांनी टाकला होता. नालासोपारा पोलिसांनी आर्टिस्ट बलराम धुलाराम जितावल (२३), आर्टिस्ट अरबाज रझ्झाक खान (२०), हिमालय हृदयनाथ पाटील (२७) आणि युनिट इंचार्ज दत्ताराम सखाराम लाड (३८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तपास अधिकारी पोलीस नाईक नितीन पाटील यांनी या चौघांना वसई न्यायालयात गुरुवारी हजर केले. न्यायाधीश एस. बी. पवार यांनी प्रत्येकी १२०० रुपये प्रमाणे चोघांना ४ हजार ८०० रुपये दंड ठोठावला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हिंदी चित्रपटाचे शुटींगही त्याच दिवशी गुंडाळण्यात आले होते.
या चारही जणांनी सार्वजनिक सुरक्षतेत धोका निर्माण केला व त्यांना जी चित्रपट शूटिंग करण्यासाठी परवानगी दिली होती त्याच्या अटी व शर्तीचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल केला होता. त्या चौघांना वसई न्यायालयाने दंड ठोठावला आहे. - वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे