संशयित दहशतवादी सर्फराज मेमन ताब्यात; इंदूरमध्ये कसून चौकशी, जबानी बदलण्याने संशय बळावला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 06:39 AM2023-03-01T06:39:21+5:302023-03-01T06:39:34+5:30
पाचव्या इयत्तेपर्यंत शिकलेला सर्फराज १२ वर्षे हाँगकाँगमध्ये राहत होता. तो अस्खलित इंग्रजी, हिंदी आणि चिनी भाषेत संभाषण करतो.
- आशिष सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या (एनआयए) सूचनेमुळे तपासयंत्रणांच्या रडारवर आलेला संशयित दहशतवादी सर्फराज मेमन याला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिस तेथे त्याची चौकशी करीत आहेत. मात्र, वारंवार जबानी बदलत असल्याने त्याच्यावरील संशय वाढला आहे.
पाचव्या इयत्तेपर्यंत शिकलेला सर्फराज १२ वर्षे हाँगकाँगमध्ये राहत होता. तो अस्खलित इंग्रजी, हिंदी आणि चिनी भाषेत संभाषण करतो. इंदूरच्या पोलिस गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त रजत सकलेचा यांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशीत बेनामी ई-मेलबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, त्याचे दोन विवाह झाले असून दुसरी पत्नी चिनी आहे. गेल्या काही दिवसांपासून दुसऱ्या पत्नीसोबत त्याचे वाद होत होते. त्याचमुळे कदाचित त्याला अडकवण्यासाठी तिने एनआयएला हा मेल पाठवला असावा. याबाबत खातरजमा करण्यासाठी तपासयंत्रणा चीनमधील वकिलांशी संपर्क साधत आहे.
उपायुक्त सकलेचा यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्फराजकडून जप्त करण्यात आलेला पासपोर्ट हाँगकाँगचा असून तो त्याला २००६ साली देण्यात आला होता. त्यावर चीन आणि हाँगकाँगला भेटी दिल्याचे शिक्केही आढळले आहेत. चौकशीत सरफराजने सांगितले की, तो हाँगकाँग येथे वर्किंग व्हिसावर काम करीत होता. त्याचदरम्यान पासपोर्टची मुदत संपल्याने स्थानिक प्रशासनाकडून त्याने पासपोर्टचे नूतनीकरण केले.
मात्र, तपासयंत्रणांनी त्याच्याकडे जुना पासपोर्ट मागितला तेव्हा तो आपल्याकडे नसल्याचे सांगत त्याने पाकिस्तानला भेट दिल्याचेही नाकारले. इंदूर गुप्तचर विभागाने आता पासपोर्ट कार्यालयाकडून त्याच्या जुन्या पासपोर्टचा तपशील मागवला आहे. त्याचप्रमाणे हाँगकाँग आणि चीनकडून त्याच्या अन्य देशांच्या वारीची माहितीही मागविली आहे.