संशयाचं भूत चढलं अन् बायकोचं डोकं वरवंट्यानं ठेचलं; घटनेनंतर पतीनेही गळफास घेतला

By अझहर शेख | Published: September 13, 2023 04:36 PM2023-09-13T16:36:39+5:302023-09-13T16:37:22+5:30

याच वादातून मध्यरात्रीच्या सुमारास संशयित विशाल याने त्याची पत्नी धनश्रीला ठार मारले व स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली

Suspecting his wife's character, the husband committed murder in Nashik | संशयाचं भूत चढलं अन् बायकोचं डोकं वरवंट्यानं ठेचलं; घटनेनंतर पतीनेही गळफास घेतला

संशयाचं भूत चढलं अन् बायकोचं डोकं वरवंट्यानं ठेचलं; घटनेनंतर पतीनेही गळफास घेतला

googlenewsNext

नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या आडगाव पोलिस ठाणे हद्दीतील स्वामी समर्थनगरमध्ये राहणाऱ्या एका इसमाने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. झोपेत असतानाच सकाळी तिच्या डोक्यात दगडी वरवंटा टाकून ठार मारले. बायको रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाडून स्वत:नेही ओढणीने गळफास घेत फाशी घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१३) उघडकीस आली आहे. गेल्या दोन दिवसांत ही दुसरी खूनाची घटना समोर आल्याने नाशिक शहर हादरले आहे.

आडगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी मध्यरात्री संशयित विशाल निवृत्ती घोरपडे (३०) याच्या डोक्यात बायकोच्या चारित्र्याच्या संशयाचं भूत शिरलं आणि त्याने शेवटी विवाहिता . धनश्री उर्फ प्रिती विशाल घोरपडे (२७) हीला संपविले आणि स्वत:ही आत्महत्या केली. आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरवस्तीस घडलेल्या या प्रकाराने स्वामी समर्थनगर हादरून गेले. हा सगळा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. घोरपडे दाम्पत्य भाडेतत्वावर येथील एका खोलीत राहत होते. पोलिसांनी खोलीचे मालक गणपत घोगरे यांच्यासह पत्नीला व मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

स्वामी समर्थ नगरमधील श्री चंद्र मौलेश्वर मंदिराजवळ तुळजा भवानी प्रसन्न बंगल्यातील एका खोलीत घोरपडे दाम्पत्य हे मुलगा रुद्र व आई कलाबाई यांच्या समवेत राहत होते. मागील दोन ते तीन वर्षांपासून भाडेकरू म्हणून तेथे वास्तव्यास होते. विशाल मखमलाबाद परिसरात असलेल्या एका मार्बल दुकानात मोलमजुरी व्यवसाय करायचा तर पत्नी धुणीभांडी काम करायची. गेल्या काही महिन्यांपासून पती पत्नी हे दोघेही एकत्र राहत असताना धनश्रीचे परिसरातील एका युवकाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय विशालला आला होता. त्यावरून दोघा पती पत्नीत या कारणावरून शाब्दिक वादही झाले होते.

याच वादातून मध्यरात्रीच्या सुमारास संशयित विशाल याने त्याची पत्नी धनश्रीला ठार मारले व स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव, पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे, पोलिस उपनिरीक्षक सुभाष जाधव, पोलिस हवालदार सुरेश नरवाडे, शिवाजी आव्हाड आदिंसह पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, वृद्ध आई असा परिवार आहे. त्याच्याविरुद्ध आडगाव पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आडगाव पोलिस करत आहेत.

Web Title: Suspecting his wife's character, the husband committed murder in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.