गृहनिर्माणमंत्र्यांना निलंबित करा! किरीट सोमय्या यांची मागणी, राज्यपालांना देणार निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 05:56 PM2021-10-15T17:56:55+5:302021-10-15T17:59:07+5:30
Kirit Somaiya's demand :गुरुवारी घडलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या अटक आणि जामीन प्रकारणानंतर शुक्रवार भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनंत करमुसे यांची भेट घेतली.
ठाणे : अनंत करमुसे प्रकरणात तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र आव्हाडांवर अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळे राज्यपालांकडे आव्हाड यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली.
गुरुवारी घडलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या अटक आणि जामीन प्रकारणानंतर शुक्रवार भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनंत करमुसे यांची भेट घेतली. अनंत करमुसे यांना एका ट्वीट वरून, राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समक्ष त्यांच्याच सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केल्यामुळे आव्हाड यांना अटक होऊन त्वरीत जामीन झाला होता, याची किरीट सोमय्या यांनी कडक शब्दात निंदा केली. सचिन वाजे, मनसूख हिरण अपहरण आणि हत्या, १०० कोटी वसुली प्रकरण अशी एकापाठोपाठ एक प्रकरणो ठाकरे सरकारच्या काळात उघड झाली असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीच आपल्या विरोधात कोणी बोलू नये यासाठी आव्हाड यांना नेमले होते. त्यातूनच अशी दहशत माजवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे ठाकरे सरकार हे माफीयांचे सरकार असल्याची टिका त्यांनी केली. करमुसे यांच्या या प्रकरणात तीन कॉन्स्टेबल निलंबित झाले परंतु जितेंद्र आव्हाड हे मंत्री असल्यानेच त्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. या संदर्भात आव्हाड यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आपण राज्यपालांची भेट घेणार असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
आता खऱ्या अर्थाने लढाई सुरु झालेली आहे, त्यामुळे आपल्यावर झालेल्या हल्याची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी अनंत करमुसे यांनी केली आहे. या प्रकरणात मागील वर्षी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु त्यानंतर एक वर्षानंतर केवळ अटक आणि तत्काळ सुटका होते, हे अतिशय दुर्देवी असल्याचेही त्यांनी सांगितले. तुम्ही मंत्री आहात, म्हणून सुटलात परंतु सामान्य माणसाची यात काय चुक असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यातही मी अश्लील पोस्ट शेअर केलेली नव्हती, किंवा त्यांच्या घरातल्यांच्या बाबतही कोणत्याही प्रकारे बोलले नव्हतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.