वाहनचालकाकडून चिरीमिरी घेणारे दोन वाहतूक पोलीस निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 07:57 PM2018-09-07T19:57:17+5:302018-09-07T20:00:43+5:30
नो पार्किंगमध्ये कार उभी करणा-या वाहन चालकाबरोबर दंडाच्या रकमेबाबत तडतोड करून चिरीमिरी घेणा-या वाहतूक शाखेच्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
पुणे : नो पार्किंगमध्ये कार उभी करणा-या वाहन चालकाबरोबर दंडाच्या रकमेबाबत तडतोड करून चिरीमिरी घेणा-या वाहतूक शाखेच्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
दिनेश गजघाटे आणि मंगेश जाधव अशी निलंबित केलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाºयांची नावे असून ते बंडगार्डन वाहतूक विभागात कार्यरत आहेत. वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून देण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा बदनाम होत असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेच्या नवनियुक्त पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी ही कारवाई केली. गजघाटे आणि जाधव या दोघांनाही २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते २ दरम्यान आरटीओ चौकात वाहतूक नियमनासाठी नेमण्यात आले होते. त्यानंतर दुपारी ३ वाजता कृष्णा जन्मोत्सवानिमित्त इस्कॉन मंदिर येथे वाहतूक नियमन करावे, अशा सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र ते इस्कॉन मंदिर येथे न जाता आरटीओ चौकातच थांबले. सायंकाळी सहा वाजता एक चारचाकी चौकात येऊन थांबली होती. त्यावेळी दोघेही कारजवळ जाऊन गाडी नो पार्किं गमध्ये का थांबविली अशी वाहनचालकाकडे विचारणा केली.
गजानन बुधवंत (रा. बाणेर) यांची ती गाडी होती. त्यानंतर ई चलन मशिनवर कारचा नंबर टाकून गाडीची माहिती घेतली. त्यावेळे त्यांना ती कार पासिंग झालेली नसल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी वाहनचालक बुधवंत यांच्याकडे दंडापोटी ६ हजार रुपयांची मागणी केली. मात्र एवढे पैसे नसल्याचे सांगत बुधवंत हे तडतोडी अंती ५०० रुपये देऊन निघून गेले. हा प्रकार वरिष्ठांच्या लक्षात आल्यानंतर दोघा पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. चिरीमिरी घेवून वाहन चालकांना सोडून देण्याची बाब पोलीस खात्याला बदनाम करणारी आहे. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याने सातपुते यांनी ही कारवाई केल्याचे समजते.
दंडापेक्षा चिरीमिरी परवडली
तेजस्ती सातपुते यांनी शाखेचा पदभार स्विकारल्यानंतर कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक असणा-या काही बाबी सुरू केल्या आहेत. तसेच नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील करण्यात येत आहे. मात्र वाहतूक नियमभंग केल्यानंतर दंडाची रक्कम देण्यापेक्षा चिरीमिरी दिलेली परवडली, अशी वाहनचालकांची मानसिकता असते. त्यामुळे दंडापेक्षा तडजोरीवर भर दिला जात आहे.