ड्रंक अँड ड्राईव्हप्रकरणी तब्बल 11 हजार वाहन चालकांचे परवाने होणार निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 04:51 PM2018-11-03T16:51:57+5:302018-11-03T16:52:31+5:30
गोव्यातील वाहतूक पोलिसांच्या मोहिमेला यश येत असल्याचा वाहतूक पोलीस अधीक्षक दिनराज गोवेकर यांचा दावा
सुशांत कुंकळयेकर
मडगाव - दारु प्यायची आहे तर गोव्यात जा! अशी सर्वसाधारण पर्यटकांमध्ये गोव्याची प्रतिमा असली तरी यापुढे दारु पिऊन गाडी चालवित असाल तर जरा सांभाळून, तुम्हाला त्यामुळे तुरुंगाची हवा खावी लागण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर तुमचा वाहन परवानाही काही काळासाठी निलंबित केला जाण्याचीही शक्यता आहे.
सध्या गोव्यात वाहतूक पोलिसांनी दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्याविरोधात कडक मोहीम सुरु केली असून जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीतच दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या तब्बल 11,152 वाहन चालकांचे परवाने निलंबित करावेत यासाठी वाहतूक़ खात्याकडे शिफारस केली आहे. वाहतूक पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे या आठ महिन्यात तब्बल 2,775 वाहन चालकांचे परवाने निलंबितही करण्यात आलेले आहेत.
वाहतूक विभागाचे पोलीस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वाहतूक विभागाकडे संकलित केलेली माहिती 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट या दरम्यानची आहे. त्यानंतरच्या पुढच्या दोन महिन्यांतही अशा कित्येक वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अशाप्रकारे निलंबनाची कारवाई झालेल्या वाहन चालकांची संख्या चार हजारावर जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
गोव्यात दरवर्षी रस्ता अपघातात 250 ते 300 या दरम्यान बळी जातात. यातील बहुतेक बळी डोक्याला हॅल्मेट नसल्यामुळे जात असले तरीही दारु पिऊन वाहन चालवून होणा:या अपघातातही बरेचजण ठार होत असतात. एवढेच नव्हे तर कित्येकदा दारु पिलेल्या अवस्थेत वाहन चालविताना ठोकर दिल्याने काहीजणांना स्वत:चा दोष नसतानाही मृत्यू आला आहे. या पाश्र्र्वभूमीवर ही मोहीम हाती घेतली असून सध्या गोव्यात पर्यटन मौसम सुरु झालेला असताना ती अधिक कडक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोव्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनीही हीच भावना व्यक्त केली. कित्येक निरपराधांचे बळी जाण्यापासून रहावेत यासाठीच ही मोहिम हाती घेतल्याचे ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सार्वजनिक वाहने चालविणाऱ्या बस चालकांच्या विरोधातही ही मोहीम हाती घेतली होती. एकाच दिवशी तब्बल 100 वाहन चालक दारु पिऊन वाहन चालवित असताना सापडले होते. या वाहन चालकांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. त्यात गोवा - मुंबई मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस चालकांचाही समावेश होता. एका मुंबईच्या चालकाला तर सात दिवसांचा तुरुंगवास ठोठविण्यात आला होता.
गोव्याचे वाहतूक विभागाचे पोलीस अधीक्षक दिनराज गोवेकर यांची याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, या मोहिमेचा चांगला निकाल मिळालेला असून तुरुंगवासाच्या भीतीने कित्येकजणांनी दारु प्यालेल्या अवस्थेत वाहन चालविणे बंद केले आहे असे आमच्या निदर्शनास आले आहे. ही मोहीम यापुढेही चालू रहाणार असून अशा वाहन चालकांना शोधून काढण्यासाठी गोवा पोलिसांना आणखी 100 आल्कोमीटर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामुळे अपघाताची संख्याही यंदा काही प्रमाणात नियंत्रणात आल्याचे त्यांनी सांगितले.