दोषारोपपत्रात खाडाखोड केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 07:15 PM2021-02-10T19:15:41+5:302021-02-10T19:15:53+5:30
Crime News : चाकण पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले पोलीस नाईक अशोक रामचंद्र जायभाये, असे निलंबन झालेल्या पोलिसाचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : गुन्ह्याच्या दोषारोपपत्रात (चार्जशीट) व्हाईटनर लावून कलम खोडून संशयित आरोपीला मदत केल्याचा ठपका ठेवत एका पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मंगळवारी (दि. ९) याबाबत आदेश दिले.
चाकण पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले पोलीस नाईक अशोक रामचंद्र जायभाये, असे निलंबन झालेल्या पोलिसाचे नाव आहे. चाकण पोलीस ठाण्यात जुलै २०२० मध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्याची कार्यवाही करण्यात आली. मात्र या दोषारोपपत्र आणि इतर कागदपत्रांवर व्हाईटनरचा वापर करण्यात आला. खाडाखोड करून व्हाईटनरने सरकारी दस्तावेजात बदल करण्यात आले. संबंधित गुन्ह्याच्या प्रकरणात संशयित आरोपीला मदत करण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याचे दिसून येते. यातून पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा ठपका ठेवत पोलीस नाईक जायभाये यांचे निलबंदन करण्यात आले.
प्रशिक्षण शिबिर टाळल्याने निलबंनाची कारवाई
पोलिस कर्मचाऱ्यांचे रामटेकडी येथे २२ दिवसांचे विशेष प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. त्यासाठी शहर पोलीस दलातील काही पोलिसांची निवड करण्यात आली. मात्र, या शिबिरातील शहरातील तीन कर्मचारी उपस्थित राहिले नाहीत. तसेच, वरिष्ठांना माहिती न देता ते परस्पर रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश सोमवारी दिले. श्रीकांत हरिशचंद्र शिंदे (नेमणूक वाकड), विजय वसंत गायकवाड (नेमणूक वाकड), जुम्मा सिकंदर पठाण (नेमणूक चिखली), असे निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांनी नावे आहेत. प्रशिक्षण शिबिर टाळण्यासाठी तीन पोलीस कर्मचारी जाणीवपूर्वक रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.