गोमांसाचा संशय.. ट्रेनमध्ये तरुणांची वृद्धाला शिवीगाळ, मारहाण; कायदा हातात घेणं भोवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 07:59 PM2024-08-31T19:59:39+5:302024-08-31T20:00:12+5:30
वृद्ध व्यक्ती सोबतच्या पिशवीतून बरण्यांमध्ये भरून मांस नेत होती. ते ट्रेनमधील प्रवासात अन्य प्रवाशांच्या लक्षात आहे. यावरून काहींनी त्या वृद्ध व्यक्तीला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तसेच मारहाणही केली.
चाळीसगावला राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीला आपल्या मुलीला भेटण्यासाठी जात असताना कल्याण ते इगतपुरी रेल्वे प्रवासात गोमांस नेत असल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्रेनमधून जाणाऱ्या तरुणांच्या टोळक्याने या वृद्धाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचे पाहून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान मारहाण करणाऱ्या आरोपांना पोलिसांनी धुळ्यातून ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाचे पुढे काय झाले, याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी कल्याण जीआरपी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या वृद्ध व्यक्तीने अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे. या निमित्त लोकांच्या मिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
महाराष्ट्रात गोमांस भक्षण करण्याला कायद्याने बंदी आहे. ही व्यक्ती सोबतच्या पिशवीतून बरण्यांमध्ये भरून मांस नेत होती. ते ट्रेनमधील प्रवासात अन्य प्रवाशांच्या लक्षात आले. यावरून काहींनी त्या वृद्ध व्यक्तीला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तसेच मारहाणही केली. यावरून एखाद्या व्यक्तीबाबत संशय आल्यानंतर या प्रवाशांनी पोलिसांना संपर्क करणे गरजेचे होते. कायदा हातात घेऊन मारहाण करण्यापेक्षा त्या व्यक्तीकडे गोमांस आहे की अन्य कुठले मांस हे तपासणे गरजेचे होते. परंतू, प्रवाशांनी संशयावरून या व्यक्तीला मारहाण केल्याने आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल करून आरोपींना पकडले आहे.
धुळे एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला होता. जळगावहून कल्याणला जाण्यासाठी वृद्ध व्यक्तीने ट्रेन पकडली होती. यावेळी सीटवरून या व्यक्तीसोबत तरुणांच्या टोळक्याने वाद घातला होता. ठाणे जीआरपी पोलिसांनी 5 हून अधिक जणांविरुद्ध भादंवि कलम 189(2), 191(2), 190, 126(2), 115(2), 324(4) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींनी ताब्यात घेण्यात आले असून त्यांना आणण्यासाठी पोलीस धुळ्याला रवाना झाले आहेत.
एखाद्या व्यक्तीला संशयावरून मारहाण करणे किंवा वाद घालण्य़ापेक्षा पोलिसांना याची माहिती देऊन गोष्टीची शहानिशा करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था पाळण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.