दाऊदच्या नावाने धमकावल्याचा संशय, रियाझ भाटी व सलीम फ्रुटकडे तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 07:29 AM2022-09-29T07:29:22+5:302022-09-29T07:29:43+5:30
डी गँगचा सदस्य रियाज भाटीसह सलीम फ्रुटला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई : अंधेरीतील व्यावसायिकाला पत्त्यांच्या खेळात ६२ लाख रुपये हरल्याचे सांगत या पैशांची वसुली करण्यासाठी धमकावणाऱ्या डी गँगचा सदस्य रियाज भाटीसह सलीम फ्रुटला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. या दुकलीकडून मुंबईतील अन्य व्यावसायिकांनाही धमकावल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार, गुन्हे शाखा तपास करत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील ४५ वर्षीय तक्रारदार व्यावसायिक हे अंधेरीमध्ये राहतात. त्याची वर्षभरापूर्वी रियाज भाटी याच्याशी ओळख झाली. त्याने मोठमोठ्या राजकीय व्यक्तींशी संपर्कात असल्याचे सांगितल्याने त्याचा व्यवसायात फायदा होईल, असे संबंधित व्यावसायिकाला वाटले होते. मात्र त्यांची पत्ते खेळण्याची आवड लक्षात घेता सलीमने त्यांना त्यात अडकवून पैशांची मागणी केली.
तसेच वसुलीदरम्यान त्यांची महागडी कारही स्वतःकडे घेतली. तसेच सात लाखही उकळले. अखेर, दोघांकडून धमकीसत्र वाढल्याने तक्रारदारांनी पोलिसांत धाव घेतली. गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. अशाच प्रकारे डी गँगच्या नावाने या दुकलीने अनेकांकडून पैसे उकळल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार दोघांकडे चौकशी सुरू आहे.