कोठडीत आरोपीचा संशयास्पद मृत्यू, चार पोलीस निलंबित, आमगाव येथील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 09:24 AM2021-05-23T09:24:56+5:302021-05-23T09:25:42+5:30
Crime News: चोरीच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या आरोपीचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ५.१५ वाजता उघडकीस आली
गोंदिया : चोरीच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या आरोपीचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ५.१५ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पोलीस निरीक्षकासह चार पोलिसांना निलंबित करण्यात आले असून सीआयडीमार्फत तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. राजकुमार अभयकुमार धोती (३०) असे मृताचे नाव आहे.
आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून दोन वेळा संगणक संच व एलसीडीची चोरी करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजकुमारसह सुरेश राऊत (३१) व राजकुमार मरकाम (२२) यांना संशयावरून अटक केली, तर एक विधिसंघर्षित बालक असल्याने त्याला अटक करण्यात आली नाही. तिघांकडून एलसीडी व इतर साहित्य जप्त केले. पथकाने या तिघांना शुक्रवारी रात्री १ वाजतादरम्यान आमगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, कोठडीत असताना राजकुमारचा शनिवारी पहाटे ५.१५ वाजता मृत्यू झाला. आमगाव पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेऊन प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे दिले आहे. आमगावचे न्यायाधीश, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. त्याचे चित्रिकरणही करण्यात आले आहे.