जर्मनीहून आलेल्या IITian युवकाचा संशयास्पद मृत्यू; ५ महिन्यापूर्वीच झालं होतं लव्ह मॅरेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:39 IST2025-04-07T17:38:35+5:302025-04-07T17:39:08+5:30
IIT तून एयरोनॉटिक्समध्ये इंजिनिअरींगची पदवी घेत अतुल २०२२ साली जर्मनीत नोकरीला गेला होता

जर्मनीहून आलेल्या IITian युवकाचा संशयास्पद मृत्यू; ५ महिन्यापूर्वीच झालं होतं लव्ह मॅरेज
जमुई - जर्मनीहून जमुईला आलेल्या इंजिनिअरचा धबधब्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. अतुल कुमार असं २८ वर्षीय मृतकाचं नाव आहे. रविवारी पत्नी प्रियासोबत तो पंचभूर धबधबा इथं फिरायला गेला होता. याठिकाणी पाय घसरून अतुलचा खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला असं पत्नीने म्हटलं आहे तर सुनेने षडयंत्र रचून मुलाची हत्या केली असा गंभीर दावा मृतक अतुलच्या आईने केला आहे. सून मुलाला टॉर्चर करायची असं सांगत आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
IIT तून एयरोनॉटिक्समध्ये इंजिनिअरींगची पदवी घेत अतुल २०२२ साली जर्मनीत नोकरीला गेला होता. होळीच्या निमित्ताने तो बिहारच्या जमुई या त्याच्या मूळ गावी आला होता. मुलाच्या मृत्यूनंतर आई सरितादेवी म्हणाल्यात की, प्रिया आणि तिच्या कुटुंबातील लोक माझ्या मुलासोबत शिवीगाळ करायचे. त्याला जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. २०१४ साली अतुलला IIT मुंबईत प्रवेश मिळाला होता. २०१९ साली तिथून शिक्षण पूर्ण करून तो बंगळुरूला जॉबसाठी गेला होता असं त्यांनी म्हटलं.
तर बंगळुरूत अतुल आणि मी एकाच कंपनीत काम करत होतो. आमच्यात आधी मैत्री झाली त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो. अलीकडेच आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. २०२२ साली अतुल जर्मनीला नोकरीला गेला. ३ वर्षाच्या अफेअरनंतर २२ नोव्हेंबर २०२४ रोजी आम्ही दोघांनी लग्न केले होते. माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत. आम्ही फिरायला गेलो तेव्हा माझा दीर सर्वात पुढे होता. अतुल त्याच्यामागे आणि मी शेवटी होती. मी त्या दोघांना वरती चढण्यापासून रोखत होते परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यांचा पाय घसरला. मी दीराला पकडणार इतक्यात अतुल खाली पडला असं पत्नी प्रियाने सांगितले आहे.
सर्व अँगलने करणार तपास - पोलीस
दरम्यान, या घटनेनंतर प्रियाने ११२ नंबरवर कॉल करून पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत हॉस्पिटलला पाठवला. प्रथमदर्शनी हा अपघात पाय घसरल्याने झाल्याचे वाटते. परंतु या प्रकरणी गुन्हा दाखल करून सर्व अँगलने पोलीस तपास करतील असं अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस मृतक आणि त्याच्या पत्नीचे बँक व्यवहार आणि मोबाईल तपासणार आहे. मागील २ वर्षापासून त्यांच्यात नाते कसे होते तेदेखील शोधणार आहे.